महापालिका रुग्णालयांसाठी खरेदी केेलेल्या एक्स रे फिल्म, केमिकल्स, ईसीजी आणि रोल्स मटेरियल आदींच्या खरेदीत गैव्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. या मटेरिअल्सच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदेनुसार स्थायी समितीने कंत्राटाला मंजुरी दिली. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी साडे आठ कोटींचे अधिकचे मटेरियल त्याच कंत्राटदारकडून परस्पर खरेदी केले.
महापालिकेच्या रुग्णालयांसाठी 16 अनुसूचितील औषधे खरेदी करून रुग्णांना मोफत दिली जातात. यातील अनुसूची चार अंतर्गत येणाऱ्या एक्स रे फिल्म, केमिकल्स, ईसीजी आणि रोल्स मटेरियल आदींच्या 119 बाबींचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. दोन वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या या मटेरिअल्ससाठी 42 कोटी 73 लाख 23 हजार रुपयांच्या कंत्राट प्रस्तवाला स्थायी समितीने मंजुरी दिली होती.
परंतु या मंजुरी नंतर प्रशासनाने मंजूर करण्यात आलेल्या 119 बाबींपैकी ८६ बाबींचे परिमाण वाढवून कंत्राटदाराकडून याची खरेदी केली. त्यामुळे या मटेरियल्स खरेदीचे कंत्राट 42.73 कोटींवरून 51.31 कोटींवर जाऊन पोहोचले. मंजुरी न घेता महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला 8. 59 कोटींचे अधिकचे काम मिळवून दिले. मध्यवर्ती खरेदी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 119 बाबींपैकी 86 बाबींचे परिमाण वाढवून देण्याबाबत विविध रुग्णालयांनी विनंती केल्यामुळे आणि रुग्णांची, रुग्णालयांची गैरसोय होऊ नये म्हणून वाढीव परिमाण खरेदी करण्यात आले.
रुग्णालयांना ज्या 119 बाबींच्या खरेदी करावयाच्या होत्या, त्यांचे परिमाण किती आहे, हे माहिती नसताना निविदाच चुकीच्या पद्धतीने काढली असल्याचे यावरून स्पष्ट होते. परिमाण वाढवून हवे होते तर, नव्याने निविदा काढता आल्या असत्या आणि पुढील गरजेप्रमाणे खरेदी करता आली असती. परंतु जाणीवपूर्वक मटेरियलची खरेदी कमी दाखवून रुग्ण आणि रुग्णालयांच्या गैरसोयीचे कारण दाखवत संबंधित कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्याचा अधिकाऱ्यांचा हेतू उघड होत आहे.
योग्य कारणाशिवाय कोणत्याही प्रकारे व्हेरिएशनचे प्रस्ताव आणले जाणार नाही, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जाहीर केले होते. आता त्यांनीच निविदा न देता मंजूर कंत्राटाच्या 21 टक्के अधिकचे काम देऊन फेरफारीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणला आहे. त्यामुळे स्थायी समिती डोळे झाक करून हा प्रस्ताव मंजूर करते की प्रशासनाला फैलावर घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.