कोस्टल रोड (coastal road) पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरदिवशी सरासरी सुमारे 24 हजार वाहने (vehicles) या मार्गावरून धावत आहेत.
वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्ग जोडण्यापूर्वी दरदिवशी सरासरी 20 हजार वाहने या मार्गावरून धावत होती. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सरासरी चार हजार वाहनांची वाढ झाली आहे.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई (mumbai) कोस्टल रोड प्रकल्प 27 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाला. कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरीसेतूच्या वरळी टोकापर्यंत असा 10.58 किलोमीटर लांबीचा आहे.
कोस्टल रोड आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू (bandra worli sea link) यांना जोडणाऱ्या पुलाचे प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सोमवारी 27 जानेवारीपासून या पुलावरून दक्षिण मुंबईतून थेट वांद्रेपर्यंत दुतर्फा वाहतूक सुरू झाली.
त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना कोस्टल रोड प्रकल्पावरून ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिका देखील सुरू झाल्या. आतापर्यंत या मार्गाचा थोडा थोडा भागच वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला होता.
मात्र 27 जानेवारीपासून हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. गेल्या महिन्याभरात या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता प्रतीदिन सरासरी गाड्यांच्या संख्येत केवळ चार हजार गाड्यांची वाढ झाली आहे.
वांद्रे -वरळी सागरी सेतू आणि कोस्टल रोड जोडण्यापूर्वी कोस्टल रोडवरून दरदिवशी सरासरी 18 हजार ते 20 हजार वाहने धावत होती. मात्र हे दोन सेतू जोडल्यानंतर आता दक्षिण मुंबईतून थेट वांद्रेपर्यंत सुसाट प्रवास सुरू झाला आहे.
तरीही वाहनांच्या संख्येत दरदिवशी सरासरी चार हजार वाहनांची भर पडली आहे. दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून दरदिवशी सरासरी 24,375 वाहने महिन्याभरात धावली. तर उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरून दरदिवशी सरासरी 23,832 वाहने धावली.
कोस्टल रोड वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण 12 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती.
उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग महिन्याभरापूर्वी पूर्ण क्षमतेने सुरू झाला. त्यामुळे या दोन्ही पुलावरून उत्तर व दक्षिण दिशेकडे नियमित वाहतूक सुरू झाली.
त्यामुळे शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने आणि वांद्रे ते शामलदास गांधी मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजेच दुतर्फा प्रवास करणे शक्य झाले आहे. मुंबई (mumbai) किनारी रस्ता दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला ठेवण्यात आला आहे.
तसेच उर्वरित कामे रात्रीच्या वेळी सुरू असतात. या मार्गावर सकाळच्या वेळी दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते तर संध्याकाळी उपनगरात जाण्यासाठी उत्तर वाहिनीवर वाहनांची संख्या जास्त असते.
हेही वाचा