मुंबईतील वाढते प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पालिकेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या असून अद्ययावत मशिन्स खरेदीवर भर दिला आहे.
मुंबईतील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएमसीने बॅटरीवर चालणारी डस्ट सक्शन मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025-26 च्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत ही यंत्रे कार्यान्वित करण्याचा पालिकेचा मानस आहे.
मुंबईत सुरू असलेली विकासकामे, रस्त्यांवरील धूळ, वाहनांमधून निघणारा धूर अशा विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
डिसेंबरमध्ये बीएमसी प्रशासनाने मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी बांधकाम आणि विकासकांसाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानंतर हवेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचेही समोर आले आहे.
मात्र, काही ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यावरील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता बीएमसीने डस्ट सक्शन मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वायू प्रदूषणाशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास केल्यानंतर, बीएमसीचा पर्यावरण आणि हवामान बदल विभाग आता सुमारे 100 धूळ शोषणारी यंत्रे खरेदी करणार आहे. यासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
येत्या पाच ते सहा महिन्यांत महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीत ही मशीन्स कार्यान्वित करण्याचा बीएमसीचा प्रयत्न आहे.
संबंधित यंत्रे बॅटरीवर चालणारी असल्याने या मशिनद्वारे रस्ते आणि बांधकामाच्या ठिकाणी उडणारी धूळ गोळा केली जाईल. त्यानंतर जमा झालेल्या धूळाची डेब्रिज रिप्रोसेसिंग प्रकल्पात विल्हेवाट लावली जाईल.
संबंधित यंत्रे बॅटरीवर चालणारी असल्याने त्यांची देखभाल फारशी खर्चिक होणार नाही. एकदा चार्ज केल्यानंतर किमान दोन ते तीन दिवस टिकण्याची त्यांची क्षमता आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा