यंदा मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसानं पुरेशी हजेरी न लावल्यानं मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून पाणीकपातीचा सामना करावा लागतो आहे. जुलैच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले. मात्र तोपर्यंत तलावांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकेने ५ ऑगस्टपासून मुंबईत वीस टक्के पाणी कपात लागू केली आहे. परंतु, आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. रविवारी हा पाणीसाठा तब्बल ११ लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं मुंबईकरांवरील पाणीटंचाईचं संकट लवकरच दुर होण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव तब्बल ९१ टक्के भरला आहे. त्यामुळं मुंबईकरांवरील पाणीटंचाईचं संकट दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याला पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही दुजोरा दिला असून लवकरच पाणीकपात मागे घेणार आश्वासन काँग्रेसला दिले आहे.
मागील १० दिवसात पाणीसाठ्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ ऑगस्टपासून सुरू झालेल्या दमदार पावसानं अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सर्व तलावांमध्ये सुमारे ६० ते ९० टक्क्यांपर्यंत साठा जमा झाला आहे. ४ ऑगस्टला तलावात ५ लाख ५ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. १५ ऑगस्टपर्यंत हा पाणीसाठा १० लाख ३७ हजार दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला तर रविवारी १० लाख ९९ हजार ४४५ दशलक्ष लिटर इतका झाला. सर्व तलाव भरण्यासाठी आणखी साडेतीन लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
सध्यस्थितीत सणासुदीचे दिवस असून घरोघरी गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. याकाळात पाणी कपात केल्यानं सामान्य मुंबईकरांच्या त्रासात भर पडली आहे. त्यामुळं पाणी कपातीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पालिका आयुक्तांना केली होती. या मागणीला सकात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी पाणीकपात मागे घेणार आश्वासन आश्वासन दिल्याचं समजतं.
हेही वाचा -
कोरोनाच्या काळात नाच-गाणे पडले महागात, ओशिवरात ९७ जणांवर कारवाई
पैशांसाठी तिने सख्या अल्पवयीन बहिणीला विकलं, मानखुर्दमधील धक्कादायक प्रकार