मुंबई आय प्रकल्प रद्द करण्याची मागणी मुंबईकरांनी पालिकेकडे केली आहे. Mumbai Eye पेक्षा स्वच्छ हवेसाठी बजेटची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणारा निधी पायाभूत सुविधांसाठी किंवा पर्यावरणीय गरजांसाठी वापरला जावा अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका नागरिकांनी सुरू केली आहे.
लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय, एक महाकाय फेरिस व्हील उभारण्याचा प्रस्ताव बीएमसीने आखला आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पात याचा निर्णय घेतला गेला. आता सध्या हा मुंबई आय कुठे उभारता येईल यासाठी जागेची शोधाशोध चालू आहे.
काही नागरिकांनी शहरात स्वच्छ हवेची मागणी करत या प्रकल्पाला विरोध केला आहे. नागरिकांनी बीएमसी आयुक्तांना हा प्रकल्प रद्द करण्याची किंवा थांबवण्याची आणि तातडीच्या पर्यावरणीय गरजांसाठी बजेटची तरतूद करण्याची मागणी करणारी ऑनलाइन याचिका सुरू केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि बीएमसी यांना पाठवलेल्या या ऑनलाइन याचिकेवर 2000 हून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली आहे. हे लोक स्वच्छ हवा, खड्डे बुजवणे, सार्वजनिक वाहतूक सुधारणे या गोष्टींना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्याच्या मागण्यांना पाठिंबा देत आहेत.
“मुंबईला वायू प्रदूषण, पूर, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सार्वजनिक पायाभूत सुविधांसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते वारंवार खोदले जातात, धूळ आणि बांधकामाचा कचरा वाढत आहे, ज्यामुळे हवेत विषारी पदार्थ वाढत आहेत. पावसाळ्यात पाणी भरते. ट्राफिकची समस्या याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.
या चिंता दूर करण्याऐवजी, कोट्यवधी रुपये महाकाय फेरिस व्हीलसारख्या प्रकल्पांवर वळवले जातील, जे शहरातील काही लोकसंख्येसाठी पर्यटन आकर्षण ठरेल, असं याचिकेत नमूद केलं आहे.
"अर्थसंकल्पीय प्राधान्यांबाबत जनतेचा आक्रोश असूनही, 2-3 एकर जमीन व्यापण्याची शक्यता असलेला हा प्रकल्प सार्वजनिक सल्लामसलतीशिवाय पुढे ढकलला जात आहे. त्यामुळे त्याच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल गंभीर चिंता निर्माण होत आहे," असे याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा