ठाणे (thane) शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवण्यात येणार आहेत. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर (badlapur) या शहरांमध्ये सहा हजारांहून अधिक अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजे 570.30 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच कंत्राटदाराला पुढील कामासाठी मंजुरी देखील दिली आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी बुधवारी प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक घेऊन हा प्रकल्प तातडीने राबविण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या प्रकल्पामुळे शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण होणार आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येतात. या शहरांमध्ये एकूण 35 पोलिस ठाणे आहेत. गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची पथके आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी शहरात नेहमीच गस्त घालत असतात.
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. ठाणे आयुक्तालय परिसरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. लहान मुले आणि महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच चोरी, दरोडे, खून, खुनाचा प्रयत्न अशा घटनाही घडत आहेत.
ठाणे आयुक्तालय हद्दीतील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात 6 हजार 51 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 570 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या कामासाठी पोलिसांनी निविदा प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेत, मेसर्स श्री सिद्धार्थ इन्फ्राटेक अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅट्रिक्स सिक्युरिटी अँड सर्व्हिलन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.
कॅमेऱ्यांची वैशिष्ट्ये
यामध्ये स्थिर, वर्तुळाकार फिरणारे कॅमेरे असतील. तसेच, मुख्य चौकात एएनपीआर कॅमेरे बसवले जातील. जे दूरवर अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्टपणे दाखवतील. वाहनांचा वेग रेकॉर्ड करणाऱ्या आरएलव्हीडी कॅमेऱ्यांचाही समावेश असेल. या कॅमेऱ्यांवर पोलिसांचे नियंत्रण राहणार आहे. ते नियंत्रण कक्षाशीही जोडले जातील.
कोणत्या भागात किती कॅमेरे?
ठाणे ते दिवा : 3,163
भिवंडी :1,347
उल्हासनगर ते बदलापूर: 1,541
एकूण: 6,051
हेही वाचा