मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर आता दैनंदिन मृतांची संख्याही वाढू लागली आहे. रविवारी ९,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण १९.१५ टक्के आहे. शनिवारी ५२,१५९ चाचण्या करण्यात आल्या. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून ९२ हजारांच्यापुढे गेली आहे. रविवारी ९,९८९ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळं एकूण कोरोनोबाधितांची संख्या ५ लाख २० हजार २१४ झाली आहे.
एका दिवसात ८ हजार ५५४ रुग्ण बरे झाल्यामुळं आतापर्यंत ४ लाख १४ हजार ६४१ म्हणजेच ७९ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती. मात्र, रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळं हा दरही आता कमी झाला आहे.
मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून, सध्या ९२ हजार ४६४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ८३ टक्के म्हणजेच ७५ हजार २५३ रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत, तर १६ टक्के म्हणजेच १४,६०९ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १,२४६ झाली आहे.
रविवारी ५८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यात ४२ पुरुष व १६ महिलांचा समावेश होता. एका मृताचे वय ४० वर्षांपेक्षा कमी होते. तर ४३ मृतांचे वय ६० वर्षांवरील होते. तर ४३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. १४ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मृतांची एकूण संख्या १२ हजार १७ झाली आहे.
मुंबईतील रुग्णवाढीचा दर रोज वाढत असला तरी तो या आठवड्यात काहीसा कमी झाला आहे. सध्या हा दर १.९३ टक्के आहे. तो गेल्या आठवड्यात २ टक्के होता. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४ दिवसांवरून ३५ दिवसांवर आला आहे.
मुंबईत रुग्णांच्या संपर्कातील ५९ हजार नागरिकांचा शोध शुक्रवारी घेण्यात आला. त्यापैकी ४२ हजाराहून अधिक नागरिक हे अतिजोखमीच्या गटातील आहेत. तर १६ हजाराहून अधिक नागरिक हे कमी जोखमीच्या गटातील आहेत.
चाचण्यांच्या प्रमाणात वाढ