भारतात कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढत आहे. दररोज अधिकाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकार महत्त्वपूर्ण उपाययोजना करत आहे. अधिकाधिक लोकांची कोरोनाची चाचणी तपासता यावी यासाठी वैद्यकीय सुविधा देखील सुधारत आहेत. अनेक ठिकाणी चाचणी केंद्र उभारली गेली आहेत. येत्या काळात आणखी चाचणी केंद्र उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
अलीकडेच बॉलिवूड गायिका कनिका कपूरची कोरोनाव्हायरससाठी पॉझिटिव्ह चाचणी झाली. यासंदर्भात तिनं इन्स्टाग्रामवर माहिती दिली. आता असं वृत्त आहे की, न्यूयॉर्क इथला लोकप्रिय शेफ आणि द बॉम्बे कॅन्टीनचा पाककृती (कलनरी) संचालक फ्लॉयड कार्डोजची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात असं म्हटलं आहे की, १ मार्च २०२० रोजी रेस्टॉरंटमध्ये पार्टी देण्यात आली होती. त्यात कार्डोजसह अनेक पाहुणे उपस्थित होते. जवळपास २०० पाहुणे या पार्टीत हजर होते. आता, कार्डोजची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, उपस्थितांना त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत आहे.
कार्डोज हे १९ फेब्रुवारी २०२० रोजी रेस्टॉरंटमधील पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुंबई इथं आले होते. आकडेवारीनुसार, १ मार्च रोजी आयोजित या पार्टीला कमीत कमी २०० लोक उपस्थित होते. या व्यतिरिक्त, भायखळा इथल्या रेस्टॉरंटच्या मालकीच्या स्वीट शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावली होती.
याबद्दल बोलताना, बॉम्बे कॅन्टीनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर सेठ म्हणाले की, १८ मार्च २०२० रोजी टीमला कार्डोजच्या चाचणीची पुष्टी मिळाली. तो कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. पार्टीत आलेल्या प्रत्येक अतिथीकडून शेफबरोबर वैयक्तिक संवाद साधला की नाही? यासंदर्भात माहिती विचारण्यात येत आहे.
कार्डोजनं ८ मार्च २०२० रोजी भारत सोडून गेले. त्यांना नंतर १८ मार्च २०२० च्या आलेल्या रिपोर्टची माहिती देण्यात आली. उपस्थित असलेल्या अतिथींव्यतिरिक्त सर्व कर्मचार्यांनाही स्वत:ला क्वारंटाईन करण्यास सांगितलं आहे.
१९ मार्च २०२० रोजी अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं होतं. परंतु, भितीचं वातावरण निर्माण होऊ नसे म्हणून सोशल मीडियावर ही माहिती देण्यात नाही आली.
कार्डोजवर सध्या न्यू जर्सी इथल्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत आणि उपचारांना तो चांगला प्रतिसाद देत आहे. त्याच्या पत्नीनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा