मुंबई - मुंबईत ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अनेक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये क्लॉक टॉवर अग्रस्थानी आहेत. मुंबईतल्या विविध ठिकाणी हे क्लॉक टॉवर आहेत. यामध्ये राजाबाई टॉवर, सीएसटी स्थानक परिसरातले क्लॉक टॉवर, गोदी गोदियाल, बाजार गेट यांचा समावेश आहे. राजाबाई क्लॉक टॉवर मुंबई विद्यापीठ परिसरात आहे. 1878मध्ये वास्तूविशारद सर जॉर्ज गिलबर्ट स्कॉट यांनी या टॉवरचा आराखडा बनवला. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे संस्थापक प्रेमचंद रॉयचंद यांनी आर्थिक मदत दिली. राजाबाई क्लॉक टॉवर हे नाव रॉयचंद यांच्या आई राजाबाई यांच्या नावावरून देण्यात आलंय.
आणखी एक प्रतिष्ठित क्लकॉक टॉवर सीएसटीला आहे. सीएसटी रेल्वे स्टेशन 1888 मध्ये सर फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी बनवलं होतं. या इमारतीवर लंडनमधील सेंट पॅनक्रॉस रेल्वे स्टेशनच्या व्हिक्टोरिअन-गॉथिक शैलीचा प्रभाव आहे. मुंबईत आणखी एक ऐतिहासिक वारशाचा क्लॉक टॉवर इंदिरा गांधी गोदीच्या परिसरात आहे.
आज दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत आपण पुढे चाललोय. पण या सर्व वास्तूंची जपणूक करण्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा हा ऐतिहासिक वारसाच इतिहासजमा होईल.