हवामान खात्याच्या अनेक अंदाजाला हुलकावणी दिल्यानंतर मुंबईसह महराष्ट्राला पावसाची आणखी दोन ते तीन दिवस वाट बघावी लागणार आहे. रविवारी मुंबईत सकाळी काही भागात ढग भरून आले होते. तर काही ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पण तो आनंद काही काळापुरताच होता. त्यानंतर काही क्षणात पुन्हा ऊन्हाच्या झळा मुंबईकरांना सोसाव्या लागल्या. गेले चार दिवस दडी मारून बसलेला पाऊस बुधवारपासून राज्याच्या अनेक भागात हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईतून पाऊस गायब झाला असला तरी सोमवारपर्यंत किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुन्हा मान्सून सक्रिय होईल, असे पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केले आहे. मुंबई आणि परिसरात पुढील 24 तासांत आकाश ढगाळलेले राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मोसमी वारे कोकणात 8 जून आणि मुंबईत 12 जूनला आल्याचे जाहीर करण्यात आले होते, तरी, एखाद-दुसऱ्या मुसळधार सरींचा अपवाद वगळता पाऊस अजूनही नीट झालेला नाही. मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये बुधवारपासून पावसाच्या सरींची संख्या वाढू शकेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मंगळवार- बुधवारपासून पाऊस परतण्याची आशा आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, गेल्या 10 दिवसात हवामान खात्याकडून वर्तवलेण्यात आलेल्या अंदाजाला पावसाने हुलकावणी दिली आहे. हवामान विभागाने 17 किंवा 18 तारखेपर्यंत पाऊस मुंबईत पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान विभागाच्या या अंदाजालाही पावसाने हुलकावणी दिली आहे.