राज्य सरकारने प्लास्टिकसह थर्माकोलवर बंदी घातल्याने या वस्तूंच्या उत्पादकांचं धाबं दणाणलं आहे. गणेशोत्सवादरम्यान थर्माकोलच्या वस्तूंची (मखर, सजावटीचं साहित्य) मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याने बहुतांश विक्रेत्यांनी थर्माकोलची आधीच खरेदी करून ठेवली होती. मात्र राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयामुळे विक्रेत्यांचं नुकसान होणार असल्याने 'थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशन'ने थर्माकोलच्या वापरसाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने थर्माकोल बंदीचा निर्णय कायम ठेवत याचिकाकर्त्यांना दणका दिला आहे. यामुळे यंदा भाविकांना बाप्पाच्या सजावटीसाठी इकोफ्रेंडली वस्तूंचाच वापर करावा लागणार आहे.
प्लास्टिक, थर्माकोलमुळं पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यानं राज्य सरकारनं राज्यभर प्लास्टीक-थर्माकोलच्या वस्तूंना बंदी घातली आहे. त्यामुळं आपोआपच थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या वस्तूंवरही बंदी आली आहे. त्यातच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, आणि दिवाळीसारखे सण जवळ येत असल्याने या वस्तूंचा वापर करणाऱ्या सजावटकरांवर संक्रांत आली आहे.
त्यामुळंच थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशननं थेट उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागत उत्सवाच्या काळात थर्माकोलच्या वस्तू वापरण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.
गणेशोत्सवासह अन्य उत्सवासाठीच्या सजावटीच्या थर्माकोलच्या वस्तू तयार करण्यासाठी, सजावट करण्यासाठी दोन-दोन-तीन-तीन महिने आधीच थर्माकोलची खरेदी केली जाते. तशी खरेदी केल्यानं कलाकार आणि सजावटकारांचं कोट्यवधीचं नुकसान होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं.
त्यावर शुक्रवारी झालेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावली. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींना परवानगी देणं शक्य नसल्याचं म्हणत न्यायालयानं बंदी कायम ठेवत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला नाही.
हेही वाचा-
बाजारात आल्या प्लास्टिकला पर्यायी वस्तू
प्लास्टिक पिशवी घेऊन या, रोपटं घेऊन जा
प्लास्टिक बंदी प्रदर्शनावरून नगरसेवकांमध्ये नाराजी