राज्यातल्या शेतकऱ्यांनी उगारलेल्या संपाच्या हत्यारामुळे खुद्द संपकरी शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला नुकसान सोसावे लागले. मात्र बाजारपेठांमध्ये भाजीविक्री करणारे अनेक जण या संपाचा गैरफायदा घेऊन अव्वाच्या सव्वा दरात भाजीविक्री करत आहेत. बाजारात भाजीपाला तसेच शेतमालाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून हे भाजीविक्रेते दुप्पट ते चारपट दरात भाजीची विक्री करत आहेत. एकीकडे शेतकरी संपाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर दुसरीकडे अवाजवी दरात भाजीविक्री करणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर चिडले आहेत. सदा सरवणकर यांनी मंगळवारी दादर परिसरात 'प्रभात फेरी' करत भाजीबाजारात भाजी आणि शेतमालाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शिवसेना स्टाइलमध्ये समज दिली.
दादरमधल्या गोखले रोडपासून भाजी मंडईपर्यंत शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह 'इशारा मोर्चा' काढला. मंडईतल्या अनेक भाजीविक्रेत्यांना भाजीचे दर विचारत, प्रसंगी दरडावत वाजवी दरात भाजीविक्री करण्याचा सल्ला सरवणकर यांनी दिला. ग्राहकांची फसवणूक करत वाट्टेल त्या दरात भाजीविक्री केल्यास 'शिवसेना स्टाइल' आंदोलनाचा इशाराही दिला. संपापूर्वीच्या काळातल्या किंमतीत भाजीविक्री करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजीविक्रेत्यांसोबत चर्चासुद्धा केली.
शेतकऱ्यांकडून कमी रकमेत खरेदी केलेला शेतमाल बाजारात चढ्या किंमतीत विकणाऱ्या भाजीविक्रेत्यांना विरोध करणाऱ्या शिवसेना लोकप्रतिनिधींचे काही दादरकर कौतुक करताना दिसले. तर शेतकऱ्यांच्या संपाला समर्थन देणाऱ्या शिवसेनेने वाढलेल्या भाजीदराबद्दल भाजीविक्रेत्याला जबाबदार धरणे चुकीचे असल्याची कुजबुजही सर्वसामान्य जनतेत सुरू होती.
भाज्यांचे दर पुढील प्रमाणे -
पूर्वीचे दर | आताचे वाढलेले दर |
---|---|
कोथिंबीर जुडी - 40 रुपये | 150 रुपये |
पुदिना - 5 रुपये | 30 रुपये |
पालक - 8 रुपये | 20 रुपये |
फ्लॉवर - 30 रुपये किलो | 100 रुपये |
टोमॅटो - 10-20 किलो | 50 ते 60 रुपये |