अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील निकाकेम कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाली. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धूर पसरला होता. या गॅस गळतीमुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे.
डोळ्यांची जळजळ, श्वास घ्यायला त्रास आणि घसा खवखवण्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली.
तर एमपीसीबीच्या कल्याण प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मात्र स्वतः न येता चक्क ड्रायव्हरला कंपनीत पाठवल्याची संतापजनक बाब समोर आली. त्यामुळे एमपीसीबीच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच आता कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 43 वर निकाकेम प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत रासायनिक उत्पादन केले जाते.
गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास या कंपनीतून अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला. या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गॅस गळतीमुळे वातावरणातील दृश्यमानता कमी झाली आहे.
एमआयडीसी अग्निशमन दल आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कंपनी शोधून काढली आणि तिथे येऊन पाहणी करत हा रासायनिक धूर थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या.
हेही वाचा