आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका (ambulance) सेवा अनेकांचे प्राण वाचवते. मात्र अनेक नागरिकांकडून याबाबत तक्रार होत आहे. जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्यास, रस्त्यावर अपघात झाल्यास नागरिकांनी तत्काळ 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली.
परंतु अनेकदा रुग्णवाहिका किती अंतरावर पोहोचली हे समजत नसल्याने रुग्णाची तब्येत आणखीन बिघडण्याच्या भितीने नागरिक चिंताग्रस्त होत आहेत.
आता मार्च 2025 पासून मोबाईल ॲपवर '108 रुग्णवाहिका'चे नवीन रूप उपलब्ध होणार आहे. या ॲपवरून रुग्णवाहिका मागवल्यास ती कुठे पोहोचली याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. राज्यभरातील 108 रुग्णवाहिका वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची स्थिती लक्षात घेऊन 108 रुग्णवाहिका सहज उपलब्ध व्हावी यासाठी मोबाईल ॲपची सुविधा मार्च 2025 पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तसेच, रुग्णवाहिका कुठे पोहोचली आहे आणि तिला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची अचूक माहिती ओला आणि उबेर ॲप्सप्रमाणे मोबाइलवर प्रदर्शित केली जाईल. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध होणार असल्याने रुग्णवाहिका चालक किंवा डॉक्टरांशी थेट संपर्क साधता येणार आहे.
वैद्यकीय आणीबाणीच्या काळात रुग्ण त्यांच्या नातेवाईकांचे पत्ते सांगण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी फोन केल्यानंतर किंवा मोबाईल ॲपद्वारे रुग्णवाहिकेला कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशन अवघ्या 15 सेकंदात आपत्कालीन प्रतिसाद केंद्रात उपलब्ध होणार आहे.
रस्त्याने जाताना एखाद्या व्यक्तीला कोणतीही वैद्यकीय समस्या आल्यास, तो मोबाईल ॲपवर जवळच्या सरकारी रुग्णालयाची माहिती मिळवू शकेल. जेणेकरून तो त्या ठिकाणी पोहोचून उपचार घेऊ शकेल. तसेच भविष्यात खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मोबाईल ॲपचा वापर करणारी व्यक्ती ज्या भागात आहे त्या भागात कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या व्यक्तीला मेसेजद्वारे तत्काळ माहिती मिळेल. यामुळे व्यक्ती सतर्क राहण्यास मदत होईल.
हेही वाचा