कोरोनाबाधितांची (coronavirus) वाढती संख्या लक्षात घेऊन मिरा भाईंदर महापालिकेने (mira bhayandar municipal corporation) शहरात पुन्हा एकदा ५ दिवस संपूर्ण लाॅकडाऊन (lockdown) लागू केला आहे. हा लाॅकडाऊन बुधवारपासून पुढील ५ दिवस लागू असणार आहे. त्यामुळे पोलिसांनी जागोजागी कडक पहारा देण्याचं काम सुरू केलं असून नाकाबंदी लावण्यात आली आहे. अत्यावश्यक गरजांव्यतिरिक्त कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या २४३ एवढी झाली, असून त्यातील २ जणांचा मृत्यू झाला आहे.
मिरा भाईंदर महापालिकेने अत्यावश्यक सेवेची दुकाने (essential services store) उघडी ठेवण्याच्या वेळेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार सकाळी ९ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत ही दुकाने उघडी ठेवता येत होती. परंतु बुधवारपासून महापालिकेने सर्वच्या सर्व दुकाने १७ मे पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी केवळ होम डिलिव्हरी सुविधाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा देखील सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यानच उपलब्ध असेल.
हेही वाचा - मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू
सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान दुधाची डेअरी उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. ही वेळ मात्र कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील कुठल्याही रहिवाशांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अडचण येणार नाही.
महापालिकेने मासे विक्रेत्यांनाही विशेष सवलत देऊ केली आहे. मासेमारीचा काळ ३१ मार्च रोजी समाप्त होतो. जूनपासून मासेमारी करण्यासाठी मच्छिमारांना समुद्रात जाता येत नाही. हे लक्षात घेऊन मिरा भाईंदर महापालिकेने मासेविक्रीला मुभा दिली आहे, जेणेकरून मासेविक्रेत्यांची उपजीविका सुरू राहील. त्यानुसार पहाटे ५ वाजेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत भाईंदर पश्चिमेकडील सुभाषचंद्र बोस ग्राऊंडच्या फूटपाथवर मासे विक्रेत्यांना मासळी बाजार लावता येईल.
मासे विक्रेत्यांव्यतीरिक्त मटण-चिकन किंवा अन्य वस्तूंच्या विक्रीला मात्र या ठिकाणी परवानगी नसेल.
हेही वाचा - कंटेन्मेंट झोनच्या बाहेर साथीचा प्रसार नको– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे