भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच आदरणीय राहिले आहे, कारण ते कुटुंबाचा कणा आहेत. सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी उभे आहे जेणेकरून त्यांना आयुष्यभर सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळेल.
येत्या महिनाभरात मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जागतिक व्यापार केंद्रात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार देवराव होळी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव डी.रा. डिंगळे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे आदी उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी करमणूक केंद्रे कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतही असे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आवडीनुसार या केंद्रात दिवस घालवू शकतात. आम्ही शाळांमध्ये आजी आजोबा डे उपक्रम सुरू केला. यानिमित्ताने राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य सरकारने पंचाहत्तरीपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवासाची सवलत सुरू केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत वाढ करण्यात आली आहे. यावेळी 80 वर्षांवरील आजी-आजोबांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फेसकॉम, हेल्पेज इंडिया, जनसेवा फाऊंडेशन या संस्थांचाही गौरव करण्यात आला.
हेही वाचा