देखभाल, दुरुस्ती आणि व्हाॅल्व्ह बदलण्याची तसेच जलवाहिन्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी कल्याण (kalyan), डोंबिवली (dombivali) शहरांचा पाणी पुरवठा येत्या गुरूवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे बंद (water cut) ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणी पुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan-dombivali municipal corporation) हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे.
तसेच कल्याण- डोंबिवली विभागातील अनेक मुख्य जलवाहिन्यांवरील व्हाॅल्व्ह खराब झाले आहेत. या व्हाॅल्व्हमधून पाणी गळती होते. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो.
याविषयी पालिकेत या पाणी गळती विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बंदच्या काळात ही व्हाॅल्व्ह दुरुस्तीची कामेही प्राधान्याने केली जाणार आहेत.
कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये हवेचे (एअर) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही भागाला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही.
डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात हा प्रश्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे. काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या भागातील भूमिगत जलवाहिन्यांची तपासणी या बंदच्या काळात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगितले.
कल्याण विभागाचे पाणी पुरवठा (water supply) विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांच्या नियंत्रणाखाली ही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रेही बंद राहणार आहेत.
या कालावधीत शहराच्या प्रत्येक भागात पुरेशा दाबावाने पाणी पुरवठा झाला पाहिजे यादृष्टीनेही ही जलवाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले.
शुक्रवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा