Advertisement

झोपडीधारकांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम वेगाने

मुंबईतील झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पारदर्शकपणे आणि योग्य प्रकारे व्हावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे झोपड्यांचे ड्रोन आणि झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येत आहे.

झोपडीधारकांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम वेगाने
SHARES

मुंबईतील (mumbai) झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पारदर्शकपणे आणि योग्य प्रकारे व्हावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे झोपड्यांचे ड्रोन आणि झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येत आहे.

एकूण 13 लाख 89 हजार 086 झोपडीधारकांपैकी 5 लाख 44 हजार 635 झोपडीधारकांचे 28 जानेवारी 2025 पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित 8 लाख 34 हजार 551 झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण व्हायचे आहे.

या झोपडीधारकांच्या (slums) सर्वेक्षणाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान झोपु प्राधिकरणासमोर आहे. ही बाब लक्षात घेऊन प्राधिकरणाने बायोमेट्रीक सर्वेक्षणाला वेग दिला असून या कामासाठी मनुष्यबळात मोठी वाढ करण्यात आली आहे.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी झोपड्यांची आणि झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करणे आवश्यक आहे. त्यानुसार झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात येते.

तसेच झोपडीधारकांनी जमा केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्रता निश्चिती करण्यात येते. परिशिष्ट -2 प्रसिद्ध केले जाते आणि यातील झोपडीधारक योजनेसाठी पात्र ठरतात. असे असताना झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीबाबत अनेक तक्रारी येत आहेत.

तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. बनावट कागदपत्रांद्वारे झोपु योजनेतील घरे लाटण्याचा प्रयत्न होत आहे. बनावट कागदपत्राद्वारे घरे लाटण्याच्या प्रकारला आळा घालण्यासह पात्रता निश्चितीची प्रक्रिया 100 टक्के पारदर्शक करण्यासाठी झोपु प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

तीन खासगी संस्थांच्या माध्यमातून 2016 मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली. 2021 नंतर नव्याने तीन खासगी संस्थांची नियुक्ती करून बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले.

2016 ते 28 जानेवारी 2025 या कालावधीत 13 लाख 89 हजार 086 पैकी 5 लाख 44 हजार 635 झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बोयोमेट्रीक सर्वेक्षणाला 2016 मध्ये सुरुवात झाली, मात्र त्याचा वेग कमी होता. मागील काही वर्षांपासून सर्वेक्षणाला वेग देण्यात आला. त्यामुळेच आतापर्यंत 5 लाखांहून अधिक झोपडीधारकांचे बायोमेट्रीक पूर्ण करण्यात यश आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आता 8 लाख 34 हजार 551 झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण शिल्लक आहे. ही संख्या प्रचंड आहे आणि 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत 31 मार्चपर्यंत या सर्व झोपडीधारकांचे सर्वेक्षण (rehabilitation) पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी तिन्ही खासगी संस्थांच्या मनुष्यबळात वाढ करून सर्वेक्षणाच्या कामला वेग देण्यात आला आहे. त्यानुसार 31 मार्चपर्यंत सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण होईल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

झोपु प्राधिकरणाकडून करण्यात येत असलेल्या बायोमेट्रीक (bio metric) सर्वेक्षणाला काही ठिकाणचे झोपडीधारक विरोध करीत आहेत. खासगी विकासकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात असल्याच्या गैरसमजातून हा विरोध होत आहे.

हा गैरसमज दूर करून सर्वेक्षण वेगाने पूर्ण करता यावे यासाठी झोपु प्राधिकरणाने लवकरच वर्तमानपत्रात एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बायोमेट्रीक सर्वेक्षण राज्य सरकार, झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

यात खासगी विकासकांचा सहभाग नाही. हे सर्वेक्षण पात्रता निश्चितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला झोपडीधारकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन या जाहीर निवेदनाद्वारे झोपडीधारकांना करण्यात येणार आहे.



हेही वाचा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर 'या' तारखेपर्यंत टोल शुल्कात सवलत

नवी मुंबई विमानतळाहून मुंबईसाठी 20 किमीचा नवीन महामार्ग

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा