अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्लाब कासकरला व्हिआयपी ट्रिटमेन्ट देणाऱ्या ५ पोलिसांना ठाण्याचे सहपोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी निलंबित केलं आहे. कासकरला पोलिसांकडून कशी व्हिआयपी ट्रिटमेन्ट दिली जात आहे, त्याला बिर्याणी खाऊ घातली जात आहे, सिगारेट दिलं जात आहे, याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कासकरला खंडणीच्या ३ वेगवेगळ्या प्रकरणांत अटक करण्यात आली असून त्याच्यावर मकोकाखाली कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात अाहे. गुरूवारी कासकरला ठाणे सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये नेण्यात आलं होतं. उपचारासाठी गेलेल्या कासकरला पोलिसांकडून चक्क व्हिआयपी ट्रिटमेन्ट देण्यात आल्याचं स्टिंग आॅपरेशन एका खासगी वृत्तवाहिनी केलं आणि एकच खळबळ उडाली.
स्टिंग आॅपरेशनमधील व्हिडिओनुसार कासकर बिर्याणीवर ताव मारताना आणि सिगारेटचे झुरके घेताना दिसला. इतकंच काय तर त्याचे नातेवाईकही यावेळी त्याला भेटायला आल्याचंही समोर आलं. तर व्हिआयपी ट्रिटमेन्ट देणाऱ्यांना पैसे वाटतानाही कासकर दिसला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी एक चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीच्या अहवालानुसार कासकरची बडदास्त बघणाऱ्या पाचही पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. उपनिरीक्षक रोहिदास डोंगर पवार, शिपाई पुंडलिक रामचंद्र काकडे, शिपाई विजय नवल हालोर, शिपाई कुमार हनुमंत पुजारी आणि शिपाई सूरज पांडुरंग मनवर अशी निलंबित करण्यात आलेल्या ५ पोलिसांची नावं आहेत.
हेही वाचा-
दाऊदच्या मुंबईतील अखेरच्या संपत्तीचा लिलाव
इक्बाल कासकरची पुन्हा तुरुंगात रवानगी