एएनसीकडून ९ नायझेरियन तस्करांना अटक

मुंबईतल्या एएनसी (अंमली पदार्थ विरोधी पथक)ने शुक्रवारी भायखळा परिसरात कारवाई करत ९ नायझेरियन तस्करांना अटक केली. यावेळी त्याच्याजवळून १०४ कोकेन आणि ९ ग्रॅम एमडी हस्तगत केली आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

एएनसीकडून ९ नायझेरियन तस्करांना अटक
SHARES

मुंबईतल्या एएनसी (अंमली पदार्थ विरोधी पथक)ने नायझेरियन तस्करांविरोधात आता चांगलीच कंबर कसली आहे. मागील आठवड्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला नायझेरियन तस्करांनी दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एएनसीचे पोलिस उपायुक्त शिवदिप लांडे यांनी या नायझेरियन तस्करांवर लक्ष केंद्रित केलं. लांडे यांच्या वरळी पथकाने शुक्रवारी भायखळा परिसरात कारवाई करत ९ नायझेरियन तस्करांना अटक केली. यावेळी त्याच्याजवळून १०४ कोकेन आणि ९ ग्रॅम एमडी हस्तगत केली आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.


पोलिसांना मारण्याचा प्रयत्न

मुंबईत नशेचा अंमल दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये परदेशी नागरिक (नायझेरियन) तस्करांचं प्रमाण सर्वाधिक आहे. भायखळाच्या खडापारसी परिसरात सतत वावरत असलेल्या तस्करांवर २० जुलै रोजी अंमली पदार्थाचे अधिकारी कारवाईसाठी गेले असता नायझेरियन तस्करांनी पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी दोन पोलिस अधिकाऱ्यांना दगडाने ठेचून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भायखळाच्या रेल्वे वसाहतीजवळील बरकले कंपाऊंडजवळ हा प्रकार घडला.


सापळा रचून कारवाई

या घटनेनंतर त्या परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणाऱ्या नायझेरियन तस्करांविरोधात एएनसीने कंबस कसली. शुक्रवारी रात्री एएनसीचे वरळी युनिट आणि आझाद मैदान पोलिसांनी या तस्करांना पकडण्यासाठी पोलिस उपायुक्त शिवदिप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.


९ नायझेरियन तस्करांना अटक

चहुबाजूने या संपूर्ण परिसराती पोलिसांनी रेकी केली होती. शुक्रवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ९ नायझेरियन तस्करांना अटक केली. चार्लिस लिजा (२७), ओकोरो अजा (३८), मासिल्स दिनो (३२), शेम्युल दिनो (३२),केन इसहेमल (३७), कोफी रोमालिक (३०), चिकू फ्राय (४३), जोकू वोचाउकू (३२) अशी या आरोपींची नावं आहेत.

हे सर्व आरोपी मालवणी, ठाणे, कोपर खैराने, नालासोपारा येथे वास्तव्यास असून हे सर्वजण मूळचे अफ्रिकन देशाचे नागरिक असल्याचं पुढे आलं आहे. या आरोपींवर एएनसीने एनडीपीएस अॅक्ट आणि भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यासर्व आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा