भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार रवी किशनला आलिशान घर देण्याच्या नावाखाली एका बिल्डरने दीड कोटी रुपयांनी गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित बांधकाम कंपनीचे ३ संचालक जीतेंद्र जैन, जीनेंद्र जैन आणि करण शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बिल्डरने रवी किशनसोबत एका वित्तीय सल्लागाराची देखील ८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
जुहू येथील सिद्धांत प्रकल्पात अभिनेता रवी किशनने घर घेण्यासाठी पैसे गुंतवले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही बिल्डर घराचा ताबा देत नव्हते. रवी किशनने १२ व्या मजल्यावर ३ हजार १६५ चौ. फुटांच्या घरासाठी त्यांना दोन वेळा ७५ लाख रुपये दिले होते. मात्र त्यांना घर न मिळाल्याने अखेर त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे कमला लँडमार्क कंपनी विरोधात फसवणुकीचा हा २४ वा गुन्हा आहे.
याच बांधकाम कंपनीचा सांताक्रूझ पश्चिमेला कमला लँडमार्क नावाचा प्रकल्प सुरू होता. यामध्ये मुख्य तक्रारदार सुनील नायर यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे ४ हजार १५ चौ. फुटांचा व्यावसायिक गाळा खरेदी केला होता. मात्र या प्रकल्पाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट(ओसी) न मिळाल्यामुळे त्यांना जुहू येथील सिद्धान्त प्रकल्पात घर घेण्याचं बांधकाम व्यावसायिकाकडून सांगण्यात आलं. हा प्रकल्प भागीदारीत सुरू असल्याचं नायर यांना सांगण्यात आलं. नायर यांनी सांताक्रूझ येथील गाळ्याऐवजी या प्रकल्पात २ फ्लॅट घेण्याचं ठरवलं. त्यानुसार गाळा परत केल्याप्रकरणी नायर यांना बांधकाम व्यावसायिकाकडून व्याजासह ६.५० कोटी रुपये मिळाले.
हेच पैसे नायर यांनी जानेवारी २०१५ मध्ये नायर यांच्या जुहू येथील सिद्धांत प्रकल्पात गुंतवून १४ व्या मजल्यावरील २ फ्लॅट व ४ वाहनांच्या पार्किंगसाठी साडेसहा कोटी विकासकाला दिले. मात्र ३ वर्ष उलटूनही त्यांना घर मिळत नव्हतं. अखेर बिल्डरने आपल्याला गंडवल्याचं कळाल्यानंतर नायर यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांच्या चौकशीत या बिल्डरने अभिनेता रवी किशनलाही अशाच पद्धतीने फसवल्याचं निदर्शनास आलं.
या सारख्या गुन्ह्यांमध्ये या बांधकाम व्यावसायिकांनी २५० हून अधिक जणांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोफा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा-
घातक शस्त्र तस्करीप्रकरणी अमित शाह अटकेत
शक्ती मिल गँगरेप प्रकरणात १४ जानेवारीला निर्णय