पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने फोर्टमधील वीर नरिमन मार्गावरील ब्रेडी हाऊस येथील शाखेला टाळं ठोकलं आहे. याचबरोबर बँकेने आतापर्यंत १८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयने पंजाब नॅशनल बँकेची व्ही. पी. रोडवरील ब्रेडी हाऊस येथील मिड कॉर्पोरेट ब्रँचला टाळे ठोकले असून तशी नोटीसच सीबीआयने या शाखेच्या बाहेर लावली आहे. कथीत घोटाळ्याप्रकरणी बँक सील करत सीबीआय कर्मचारी वगळता कोणालाही आतमध्ये प्रवेश नसल्याचं या नोटीसमध्ये म्हटले आहे.
पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ३०० कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी अद्याप फरार आहे. या घोटाळ्यात सामील असलेला पीएनबीचा ब्रीच कँडी येथील शाखेचा निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीसह हेमंत भट्ट, मनोज खरा या तिघांना सीबीआयने यापूर्वीच अटक केली आहे.
अंमलबजावणी संचनालयाने सोमवारी नीरव मोदी प्रकरणात मुंबईसहित, सूरत, दिल्ली, लखनऊ, गाझियाबाद आणि नोएडा इथल्या ३९ ठिकाणी छापे टाकून २२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पुण्यातील गीतांजली ज्वेलर्सच्या शोरुमसोबत राज्यात इतर ४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तर रविवारी याप्रकरणी ४५ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. आतापर्यंत आरोपीची ५ हजार ७१६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यात प्रामुख्याने हिऱ्यांचा समावेश असून मालमत्तांचा समावेश नसल्याची माहिती ईडीचे संचालक कर्नल सिंग यांनी दिली.
दरम्यान, सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी (सीव्हीसी) सोबत पीएनबी, आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एक प्रेझेंटेशन सादर केलं. त्यानुसार 'सीव्हीसी'ने आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाकडून घोटाळ्याचा अहवाल मागितला आहे. 'सीव्हीसी'ने या घोटाळ्यात सामील असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे मागितली.
सोबतच सीबीआयने नीरव मोदीचे सीएफओ विपुल अंबानी याचीही पुन्हा चौकशी केली. विपुल रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा चुलत भाऊ आहे. सीबीआयने १० निलंबित कर्मचाऱ्यांची ८ तास चौकशीही केली.
हेही वाचा-
पीएनबी घोटाळ्यात ब्रँच मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीसह दोघांना अटक
नीरव मोदीची ५,१०० कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईतल्या ४ मालमत्तांचा समावेश