रणजी ट्रॉफीमध्ये निवड करून देतो असे सांगून सहा खेळाडूंकडून पैसे उकळण्यात आले. जवळपास ६३ लाखांचा अपहार करत फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत वसंत कांबळे आणि देवेश उपाध्याय अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी संबंधित सहाजणांना विविध राज्याच्या क्रिकेट असोसिएशनचे बोगस नियुक्ती पत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तक्रारदार रत्नागिरीचे रहिवासी असून एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.
प्रशांत हा तक्रारदारांचा मित्र असून पंधरा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना ओळखतात. ते दोघेही रत्नागिरी संघातून क्रिकेट खेळले होते. नंतर प्रशांतची अंडर 23मध्ये निवड झाली होती. याच दरम्यान त्याने त्यांची देवेशशी ओळख करून दिली होती. देवेश हा सिनेअभिनेता सोनू सूदचा सहाय्यक असल्याचे सांगितले होते.
सहा वर्षांपूर्वी त्याने तक्रारदारांना त्याची बीसीबीआयच्या काही पदाधिकार्यांशी चांगली ओळख आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीसाठी चांगले खेळाडू असतील तर तो त्यांची शिफारस करु शकतो असेही सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने त्याच्याकडे त्यांच्या परिचित पाच खेळाडूंची नावे दिली होती. त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील असे सांगितले होते.
आधी सांगितल्याप्रमाणे प्रशांतने देखील या सहाजणांची रणजी ट्रॉफीमध्ये निवड करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी काही खर्च अपेक्षित असल्याने त्यांनी देवेश आणि प्रशांतच्या बँक खात्यात टप्याटप्याने कॅश आणि ऑनलाईन सुमारे 66 लाख रुपये जमा केले होते.
पैसे जमा झाल्यानंतर या सहा खेळाडूंसोबत त्यांनी एक करार केला होता. मणिपूर, नागालँड, बिहार आणि मिझोरम क्रिकेट असोसिएशनचे नियुक्तीपत्र दिले होते.
काही दिवसांनी त्यांना संबंधित राज्यात पाठविण्यातही आले, मात्र सातच दिवसांनी त्यांना परत बोलाविण्यात आले. नंतर मात्र सतत विविध करणे सांगून आपली फसवणूक होत असल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने चौकशी केली असता, त्यांनी दिलेले क्रिकेट असोसिएशनचे नियुक्तीपत्रही बोगस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या खेळांडूनी त्यांच्याकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी स्वतः तक्रारदार या दोघांच्या संपर्कात राहून त्यांच्या पैशांविषयी विचारणा करत होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पैसे परत केले नाहीत. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मालाड पोलिसात प्रशांत कांबळे आणि देवेश उपाध्याय यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून सुमारे ६३ लाखांचा अपहार करुन सहा खेळाडूंची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा