मुंबईत एका २२ वर्षीय तरुणावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, या बलात्कारासाठी पीडित मुलाला कुर्ला येथील हॉटेलबाहेर काढलेला सेल्फी कारणीभूत ठरला आहे. इन्स्टाग्रामवरील ओळखत असल्याचं सांगून ४ जणांनी हॉटेलबाहेरून तरुणाचं अपहरण करून त्याच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी पीयूष चौहान (२३), मेहुल परमार (२१), असिफअली अन्सारी (२४) या तिघांसह चौथ्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
कुर्ला पश्चिम येथील नवाब शीख पराठा या हॉटेलमध्ये २२ वर्षीय मुन्ना (बदललेले नाव) यानं जेवण केलं आणि हॉटेलबाहेर येऊन सेल्फी काढला. हॉटेलचं नाव दिसत असलेला हा फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर टाकला. त्यानंतर त्याचा हा फोटो पाहून २ तरुणांनी त्याला संपर्क करत त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितलं. काही वेळेतच हे दोघे दुचाकीवरून त्या हॉटेलजवळ पोहोचले आणि मुन्नाला मध्यभागी बसवून विद्याविहारच्या दिशेनं घेऊन गेले.
विद्याविहार येथील नीलकंठ बिझनेस पार्कजवळ नेऊन मुन्ना याला एका कारमध्ये बसण्यास सांगितलं. या ठिकाणी आणखी दोघे आधीच उपस्थित होते. त्यापैकी एकानं कार सुरू केली आणि इतर तिघांनी धावत्या कारमध्येच मुन्ना याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा मोबाइल आणि पाकीट काढून घेत डेबिट कार्डवरून २ हजार रुपये काढले आणि २ हजाराचे पेट्रोल भरलं. त्यानंतर त्याला कारबाहेर फेकले व चौघांनीही पळ काढला.
मुन्ना यानं १०० क्रमांकावर आणि पालकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र हा सर्व प्रकार विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं त्यांना याबाबत कळविण्यात आले. विनोबा भावे पोलिसांनी कलम ३७७ (अनैसर्गिक शारीरिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं असून सर्व आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असून त्याला बालसुधार गृहात पाठविण्यात आलं आहे.
हेही वाचा -
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन
प्रिन्सेस डॉक इथं मरीना प्रकल्प उभारण्यात येणार