गँगस्टर रवी पुजारीकडून विकासकाला धमकी, गुन्हे शाखा ८ कडे तपास

वाकोल्यातील एका प्रसिद्ध विकासकाला कुख्यात गुंड रवी पुजारीने खंडणीसाठी धमकावल्याची बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर हा गुन्हा अधिक तपासासाठी गुन्हे शाखा ८ कडे वर्ग केला आहे.

गँगस्टर रवी पुजारीकडून विकासकाला धमकी, गुन्हे शाखा ८ कडे तपास
SHARES

मुंबईत सुरू असलेल्या अनेक पुनर्विकास प्रकल्पांवर कुख्यात गुंडांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. टक्केवारीसाठी स्थानिक राजकारण्यांनी प्रकल्प वेठीस धरले असतानाच, आता गँगस्टर्सकडून खंडणीसाठी येणाऱ्या धमक्यांनी विकासक त्रस्त झाले आहेत. नुकतीच वाकोल्यातील एका प्रसिद्ध विकासकाला कुख्यात गुंड रवी पुजारीने खंडणीसाठी धमकावल्याची बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर हा गुन्हा अधिक तपासासाठी गुन्हे शाखा ८ कडे वर्ग केला आहे.


झोपडपट्टी पुनर्विकासातून वाद

वाकोल्यात झोपडपट्टी पुनर्विकासा अंतर्गत विकासकाने मागील काही वर्षात काही इमारती बांधल्या आहेत. या इमारतींच्या बांधकामावरून स्थानिक रहिवाशी शमीउल्ला तेअरमन (नाव बदललेले आहे) याचा विकासकाशी वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, शमीउल्लाने गुंड रवी पुजारीची मदत घेतली. त्यावरून काही दिवसांपासून हा वाद मिटवण्यासाठी रवी पुजारीने फोन करून विकासकाला शमीउल्लाशी तडजोड करण्यास सांगितली. तसेच विकासकाकडे १२ कोटींची खंडणीही मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.


प्रकरण गुन्हे शाखा ८ कडे वर्ग

पुजारीच्या रोजच्या धमक्यांना घाबरून अखेर विकासकाने पोलिसात धाव घेतली. वाकोला पोलिसात विकासकाने गुन्हा नोंदवल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता हा गुन्हा पुढे गुन्हे शाखा ८ कडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस तपासादरम्यान विकासकाला आलेले फोन हे संगणकीय यंत्रणेद्वारे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेकॉर्ड करण्यात आलेल्या फोनवरील आवाज हा नक्की रवी पुजारीचाच आहे का? याचा पोलिस तपास करत आहेत.


सर्वाधिक खंडणीचे गुन्हे पश्चिम उपनगरांत

शहरातील विविध पोलिस ठाण्यांत नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांवर लक्ष दिले असता आणि पश्चिम उपनगराचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता गुंडांनी या विभागात सर्वाधित विकासक, व्यावसायिक यांना धमकावल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये दक्षिण मुंबईत गुंडांकडून धमकावल्या प्रकरणी २० गुन्ह्यांची नोंद आहे. तर पूर्व उपनगरात २५ गुन्ह्यांची नोंद आहे. उत्तर मुंबईत ४६ गुन्ह्यांची नोंद आहे. तर मध्य मुंबईत ४१ गुन्ह्यांची नोंद आहे. तर सर्वाधिक नोंद ही पश्चिम उपनगरांत झाली असून आता पर्यंत ६१ गुन्ह्यांची नोंद इथे झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

दिग्दर्शक रेमो डिसुझाला धमकी: पुजारी टोळीच्या हस्तकाला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा