थिएटरच्या बाहेर रेंगाळणारा चित्रपटांच्या तिकिटांचा काळाबाजार आता रेल्वेच्या कुंपणातही शिरला आहे. सुट्यांच्या हंगामात भरभरून वाहणाऱ्या आरक्षण यादीच्या पार्श्वभूमीवर या काळाबाजाराला रंग चढला आहे. विशेष म्हणजे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरसीएफ) पोलिसांनी मानखुर्द परिसरात कारवाई करत तब्बल ४४ ई-तिकिटेही जप्त केली. इंद्रजीत गुप्ता (३२) असं या आरोपीचं नाव असून चौकशीत त्याने आतापर्यंत ५८ लाख रुपये किंमतीची म्हणजेच दोन हजारहून अधिक तिकिटांची अवैधरित्या विक्री केली आहे. रेल्वे तिकिटांच्या या काळ्या बाजारातील एजंटमुळे प्रवाशांना वाजवी रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागत आहे.
दिवाळीच्या सुट्यांचा हंगाम सुरू होण्याच्या दोन महिने आधीपासूनच लांब पल्ल्यांची आरक्षण यादी ओसंडून वाहू लागते. ‘मुलुख’ला आणि ‘गावाक्’ जाणाऱ्या प्रवाशांच्या आरक्षणाच्या उत्साहामुळे प्रतीक्षा यादीही भरभरून वाहायला लागते. अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी तर हजारांच्यावर पोहोचल्याचंही पाहायला मिळतं.
तिकीट मिळेल की नाही, या चिंतेत असलेल्या प्रवाशांना त्यामुळे तिकीट दलालांचा आधार घ्यावा लागतो. हे दलाल तिकिटं आगाऊ आरक्षित करतात आणि त्यानंतर मग गरजू प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट किमतीत विकतात. रेल्वेच्या तिकीट यंत्रणेपेक्षाही जलद सॉफ्टवेअर वापरून अवैधरित्या हे एजंट ई-तिकिटे आगाऊच मिळवत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
शनिवारी आरपीएफ पोलिसांना इंद्रजीत या एजंटची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचून बोगस गिर्हाईकाच्या मदतीने त्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मानखुर्द येथील अड्यावर कारवाई करत दोन लाख मूल्यांची ४४ ई-तिकिटे जप्त केली. प्राथमिक तपासात यापूर्वीही इंद्रजीत गुप्ता (३२) या आरोपीने सुमारे ५८ लाख किंमतीची दोन हजारांहून जास्त तिकिटे अवैधरित्या प्राप्त केल्याचं आढळून आलं. या रॅकेटमध्ये अन्य कोणी साथीदारांचा समावेश आहे का? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.