पुणे पोलिसांनी डाॅ. आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक अवैध असल्याचा निर्णय विशेष न्यायालयाने दिला अाहे. तसंच तेलतुंबडे यांना तातडीने सोडण्याचे अादेशही न्यायालयानने दिले अाहेत. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाने पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला अाहे. भीमा कोरेगाव दंगल भडकवण्याप्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबध असल्याच्या संशयावरून तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी मुंबईतून शनिवारी सकाळी अटक केली होती. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात अालं.
भीमा कोरेगाव दंगल भडकवण्यामागे तेलतुंबडेसह अन्य काही जणांचा हात होता. त्याचबरोबर तेलतुंबडे यांचे नक्षलवाद्यांशीही अप्रत्यक्ष संबध असल्याचं पुढं आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात अटकेची कारवाई टाळण्यासाठी तेलतुंबडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आनंद तेलतुंबडे यांना शनिवार पुणे पोलिसांनी अटक केली.
पुण्याच्या शनिवार वाडा परिसरात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत उपस्थितांकडून प्रक्षोभक भाषणं करण्यात आली.१ जानेवारी २०१८- कोरेगाव भीमा येथे हिंसाचार होऊन सणसवाडी येथे दोन गटातील चकमकीत एक जण ठार झाला. त्यातून राज्यभर दलितांनी आंदोलन सुरू केलं. हा हिसांचार घडवण्यामागे सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सम याचा हात असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना आनंद तेलतुबंडे यांचं नाव पुढे आलं. पोलिसांना शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळाले आहेत, त्यानुसार तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा असं सुचित केल्याचं समोर अालं. मात्र, हा मेल बनावट असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. आनंद तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून २०१७ ला पॅरिसला गेले होते. त्याचा खर्च त्या विद्यापीठाने केला होता. या दौऱ्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही, असंही मत तेलतुंबडे यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडलं. न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नसल्याचं तेलतुंबडे यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल दिला. न्यायालयाने तेलतुंबडे यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना विलेपार्ले येथील मुंबई विमानतळावरून शनिवारी पहाटे ३ वा. अटक केली होती.
हेही वाचा -
'संधी'साधू! २६ कोटींचे डायमंड चोरून चोर शिरला युपीतील कुंभ मेळ्यात