चित्रपटाच्या निर्मितीसाठी कोट्यावधी रुपये घेत, व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या निर्माती प्रेरणा अरोरानं त्या पैशातून बंगला, सौंदर्य प्रसाधनं, पादत्राणे आणि कपड्यांवर खरेदी केल्याचं तपासात पुढे आले आहे. यासाठी तिनं तब्बल तीन कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचं आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे.
प्रसिद्ध निर्माती प्रेरणा अरोराविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयात १७६ पानांचं आरोपपत्र सोमवारी दाखल केलं. केदारनाथ, पॅडमॅन या चित्रपटांसाठी अरोरा यांनी वासू भगनानीसह इतर दोन जणांकडून पैसे स्विकारत त्यांची ३१ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं निर्माती प्रेरणा अरोराला मागील वर्षी अटक केली होती. प्रेरणानं २०१६ ते १८ यावर्षात प्रेरणाची आई प्रतिमा अरोरा हिच्या नावानं असलेल्या ‘क्रिआर्ज इंटरटेन्मेन्ट’ द्वारे केदारनाथ, पॅडमॅन, टाॅयलेट एक प्रेम कथा, रूस्तम, परी या बजेट सिनेमांसाठी पैसे घेतले होते.
यातील केदारनाथ आणि पॅडमॅन या सिनेमांचे अधिकार नसताना तिने वासू भगनानी यांच्यासह इतर दोन जणांकडून पैसे घेतले होते. दोन्ही सिनेमांनी चांगली कमाई केली. मात्र देणेकऱ्यांचे पैसे तिनं परत केलेच नाहीत. याप्रकरणी भगनानी यांच्यावतीने पुजा फिल्म कंपनीचे व्यवस्थापक नागेश वैदीकर यांच्यासह तर दोन कंपन्यांनी १४ जुलै २०१८ मध्ये प्रेरणाविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडं तक्रार नोंदवली. या गुन्ह्यात पोलिसांनी प्रेरणाला ७ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणात २५ साक्षीदारांची साक्ष नोंदवत मागील आठवड्यात आरोपपत्र दाखल केलं.
प्रेरणा विरोधात ५० कोटींचा अपहार केल्याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीत चार गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपपत्रानुसार, क्रिआर्ज एंटरटेन्मेंटची संचालक असलेली प्रेरणाची आई प्रोतिमा हिनं खंडाळ्यानजीक कुणेगाव इथं एका अभिनेत्याच्या कंपनीकडून बंगला खरेदी केला. या आठ कोटीच्या बंगल्यासाठी तिनं आगाऊ रक्कम म्हणून दोन कोटी ८५ लाख रुपये पुढे केले आहेत. तसंच तीन कोटीचे तिनं ब्रँडेड कपडे, पर्स, हँडबॅग, पादत्राणे, अत्तर, गॉगल आणि सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. तर सिक्युरिटी गाडला ओव्हर टाइम करण्यासाठी त्याचा पगारही १६ हजारांवरून थेट ५० हजार रुपये केल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा