अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बदनामीची भीती दाखवत व्यावसायिकाकडून पैसे लाटणाऱ्या दाम्पत्याला खार पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नुकतीच या दांपत्यांनी खार येथील प्रसिद्ध व्यावसायिकाकडून अशाप्रकारे २ लाख रुपये उकळले होते. मात्र या दांपत्यांची पैशांची भूक दिवसेंदिवस वाढत गेल्यानं ६० वर्षीय व्यावसायिकानं पोलिसांत धाव घेतली. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत उमेर सोलंकी (३८) व त्याची पत्नी शबनम (३५) या दोघांना अटक केली आहे.
उद्योजक अाणि आरोपी शबनमची काही महिन्यांपूर्वी एका पार्टीत ओळख झाली. याच ओळखीतून शबनमने अापल्या एका मैत्रिणीला पैशांची गरज असल्याने व्यावसायिकाकडे मदत मागितली होती. त्यानंतर व्यावसायिक व मदतीसाठी अालेल्या तरुणीमध्ये जवळीकता वाढली. मोठमोठ्या हाॅटेलमध्ये भेटीगाठी होऊ लागल्या. याचा फायदा उचलून या दाम्पत्याने व्यावसायिकाला जाळ्यात अडकवण्याचा प्लान अाखला.
व्यावसायिक अाणि ती तरुणीसोबत एका भेटीदरम्यान अश्लील चाळे करत असतानाचे चित्रिकरण या दाम्पत्याने केले. त्यानंतर या दाम्पत्याने व्यावसायिकाला पैशांसाठी धमकावण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास, तरुणीसोबतची छायाचित्रं पत्नीला दाखवण्याची धमकी व्यावसायिकाला दिली.
दांपत्यांनी अश्लिल चित्रण पत्नीला दाखवण्याची आणि सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या व्यावसायिकानं सुरुवातीला त्यांना दोन लाख रुपये टप्याटप्यानं दिले. तक्रारदाराकडून कधी २० हजार, ३० हजार अशा रकमा आरोपींनी घेतल्या आहेत. तसंच एकदा आरोपींनी व्यावसायिकाच्या हातातील अंगठीही काढून घेतली होती.
पण आरोपींच्या मागण्या दिवसेंदिवस वाढू लागल्या. या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर व्यावसायिकानं या दोघांविरोधात ८ मे रोजी खार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२ व ३८२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी अारोपींना अटक केली. या दोघांनी अशाप्रकारे किती जणांना धमकावून पैसे उकळले आहेत, याचा शोध पोलीस घेत अाहेत.
हेही वाचा -
१० वर्षे गैरहजेरी, तरीही फूल पगारी!