येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली असून ती २० मार्च करण्यात आली आहे. पीएमएलए कोर्टाने हे आदेश दिले आहेत. कपूर यांना ७ मार्चला ईडीने ३0 हजार कोटी रुपये कर्ज विविध कंपन्यांना दिल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर याचा कसून तपास सुरू आहे. दरम्यान १६ मार्चपर्यंत दिलेली कोठडी समाप्त झाल्याने त्यांना न्यायाधीश पी. आर. राजवैद्य यांच्या समोर हजर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने देखील राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू आणि ३ मुलींविरोधात गुन्हा दाखल केला असून आर्थिक खाते वेगळा तपास करत आहे.
हेही वाचाः- Coronavirus Updates: एसटी कर्मचारीही घालणार मास्क, कोरोना टाळण्यासाठी उपाय
डीएचएफएलच्या अल्प मुदतीच्या कर्जरोख्यांत येस बँकेने ३ हजार ७00 कोटी रुपये गुंतवले होते. हा पैसा गुंतवण्याच्या बदल्यात दिवाण हाऊसिंगने राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांना तब्बल सहाशे कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. राणा कपूर व कपिल वाधवान यांनी यासाठी कट रचल्याचाही सीबीआयचा आरोप आहे. मुंबईस्थित डीएचएफएलचे याआधीच दिवाळे निघालेले आहे. येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार एप्रिल-जून २0१८ मध्ये सारा कट रचण्यात आला होता. येस बँकेचा पैसा दिवाण डीएचएफएलमध्ये गुंतवण्याच्या बदल्यात दिवाण हाऊसिंगने कपूर कुटुंबाच्या डीओआयटी अर्बन व्हेंचर्स इंडिया प्रा. लि. ला प्रचंड प्रमाणावर पैसा दिला होता.
हेही वाचाः- Corona virus: ५०% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम करा - पालिका
हवाला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे होते तसेच आलिशान पाट्र्या देण्यासाठी ते प्रसिद्ध होते, असे सूत्रांनी सांगितले. जर तुम्ही मोठा पैसा गुंतवला नाही तर तुम्हाला मोठा माल मिळणार नाही; असे ते नेहमी म्हणत असत, अशीही चर्चा आता रंगली आहे. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचे नाही, असा राणा कपूर यांचा स्वभाव होता. गेल्या काही वर्षात येस बँकेचा ताळेबंद २६ पटीने वाढला होता. मात्र यात मोठा घोटाळा होता, असेही बोलले जात आहे.