वडाळा - प्रतीक्षानगरच्या ओमसाई इमारतीसमोर एका तरुणाला भोसकल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत सिद्धेश पाडेलकर (22) हा युवक जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी निनाद उर्फ लाडू, स्टॅलिन, महेश , भास्कर उर्फ बंटी या आरोपींना वडाळा टी टी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. निनाद उर्फ लाडू आपल्या तीन मित्रांसह लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला प्रतिक्षानगरच्या ओम साई इमारतीमध्ये आला होता. यावेळी पार्टी सुरू असताना त्याने सिद्धेश पाडेलकरला पहिले आणि त्याचा राग अनावर झाला. काही केल्या चालून आलेली संधी सोडायची नाही या हेतूने निनादने तात्काळ आपल्या मित्रांशी संवाद साधूत सिद्धेशला मारण्यास सुरुवात केली. हे पाहून सिद्धेशच्या मित्रांनी भांडणात हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. हाणामारी सुरु असताना निनादने आपल्याकडील धारधार चाकू घेऊन सिद्धेशच्या छातीत घुसवला. दरम्यान मित्रांनी तात्काळ सिद्धेशला शीव रुग्णालयात दाखल केलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भगवान भाबड यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि एपीआय प्रकाश लिंगे आणि पथकाच्या मदतीनं अवघ्या काही तासांतच परळच्या केईएम परिसरातून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करतायेत.