मुंबई विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका आता ‘आयडॉल’ च्या विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. येत्या 23 एप्रिलपासून आयडॉलच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमची परीक्षा सुरू होत आहे. परंतु, या विद्यार्थ्यांना अद्याप त्यांचे हॉलतिकीट मिळालेले नसून सोमवारी परिक्षेला कसे बसणार? असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.
हॉलतिकीटासाठीची वेबसाईट ‘बंद’!
या परीक्षांच्या हॉलतिकीट वाटपाची घोषणा करताना यंदापासून ही हॉलतिकीटे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉग-इन आयडीवरून घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाने http://idoloa.digitaluniversity.ac/ या वेबसाइटची घोषणाही केली. या वेबसाइटसह 'आयडॉल'च्या http://idoloa.digitaluniversity.ac/ आणि http://mu.ac.in/portal/distance-open-learning/ या वेबसाइटवरूनही हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
शनिवारी रात्रीपर्यंत तोडगा नाही
दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर लॉग-इन करण्यास सुरुवात केली असता वेबसाईट सुरूच होत नव्हती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयडॉलच्या तांत्रिक विभागाकडे तक्रार दाखल केली. परंतु, या तक्रारींवर शनिवारी रात्रीपर्यंत काहीच तोडगा निघाला नाही. तसेच 22 एप्रिलला रविवार असल्याने विभागाला सुट्टी होती. त्यामुळे सोमवारी जर विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटात काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त कुठे आणि कशा करायच्या? असा प्रश्नही विद्यार्थ्यांना पडला आहे.
प्रशासनाचा ‘दावा’ खोटा
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षा सुरळीत पार पडतील असा दावा प्रशासनातर्फे केला जात होता. मात्र, हा दावा परीक्षा सुरु होण्याआधीच खोटा ठरला असून परीक्षा विभाग तोंडघशी पडला आहे.
ऑफलाईन हॉल तिकिटांची मागणी
दरम्यान, या प्रकरणी युवा सेनेचे सिनेट सदस्य वैभव थोरात, साईनाथ दुर्गे आणि सचिन पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत विद्यापीठाने तातडीने ऑफलाइन हॉलतिकीटे जारी करावीत, अशी मागणी केली होती.
प्रशासनाचं आश्वासन, पण कृती कधी?
यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाची बाजू मांडताना विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी तांत्रिक अडचणींमुळे हा घोळ झाल्याचे मान्य केले आहे. 'शनिवारी सकाळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हॉलतिकीट मिळण्यास थोडा उशीर झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेतली असून लवकरात लवकर हा गोंधळ सोडवला जाईल', असे आश्वासन त्यांनी दिले आहे.