Advertisement

SSC-HSC Results: जुलै अखेरपर्यंत लागणार दहावी, बारावीचा निकाल

१५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल कुठल्याही परिस्थितीत लावण्यात येईल, असं आश्वासन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.

SSC-HSC Results: जुलै अखेरपर्यंत लागणार दहावी, बारावीचा निकाल
SHARES

दहावी-बारावीचे निकाल कधी लागणार याकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यातच कोरोना काळात ९७ टक्के उत्तरपत्रिका परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून त्यांचं स्कॅनिंग वेगाने सुरु आहे. त्यानुसार १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल कुठल्याही परिस्थितीत (maharashtra hsc and ssc results will declare by end of july 2020) लावण्यात येईल, असं आश्वासन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवार २२ जून २०२० रोजी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शकुंतला काळे आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका कितपत तपासून झाल्या आहेत, दहावी-बारावीचे निकाल कधीपर्यंत मिळणं अपेक्षित आहेत? यासंबंधीची विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

९७ टक्के उत्तरपत्रिका जमा

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं की, यंदा मार्च २० च्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स लॉकडाऊनपूर्वी संपले होते. मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. त्याबाबतही निर्णय झाल्याने आता निकाल लावण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरु आहे. कोरोना काळात ९७ टक्के उत्तरपत्रिका परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या आहेत. त्यांचं स्कॅनिंगही वेगाने सुरु आहे. जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, अशी माहिती शकुंतला काळे यांनी दिली. 

हेही वाचा - दहावी-बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केलेली नाही, मंडळाकडून खुलासा

अकरावी प्रवेश प्रक्रिया

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल एप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

काही दिवसांपूर्वी सध्या दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर करण्यात आल्याच्या बातम्या साेशल मीडियावर फिरत आहेत. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तेव्हा विद्यार्थी-पालकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं मंडळाकडून जाहीर करण्यात आलं होतं.  

हेही वाचा - जुलैमध्ये जाहीर होणार १०वी व १२वीचा निकाल?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा