मुंबई विद्यापीठाने यंदाच्या वर्षापासून कलाशाखेच्या पदवीसाठी मराठी साहित्य या विषयातील अभ्यासक्रमात बोली भाषांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कलाशाखेच्या द्वितीय वर्षासाठी विद्यार्थ्यांना आगरी, मालवणी आणि वाडवळी या तीन भाषांपैकी एक भाषा निवडता येणार आहे.
प्रत्येक गावाची एक बोली भाषा असते. बोली भाषा ही त्या त्या गावाची ओळख असते. त्यामुळे बोली भाषा टिकवणे गरजेचे आहे, अशी मागणी अनेक संस्थांनी विद्यापीठाकडे केली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रम समितीने यंदाच्या वर्षापासून आगरी, मालवणी आणि वाडवळी या बोली भाषांचा पदवीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
आगरी भाषेच्या अभ्यासक्रमात भाषासौंदर्य, तिची लकब, इतिहास, व्याकरण, म्हणी आदींचा समावेश आहे. मालवणी भाषेच्या अभ्यासक्रमात चाकरमानी हे नाटक आणि कथा अभ्यासासाठी आहे, तर वाडवळी भाषेच्या अभ्यासक्रमात नाटक, कादंबरी आणि लोकसाहित्याचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी 100 गुणांचा स्वंतत्र पेपर असेल.
विद्यापीठाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. आतापर्यंत बोली भाषेला तितकेसे महत्त्व नव्हते. ही खूप मोठी घटना आहे. अनेक बोली भाषा मिळून मराठी भाषा तयार झाली आहे. या तिन्ही बोली भाषांप्रमाणेच अनेक बोली भाषा आपल्याकडे बोलल्या जातात. मला वाटतं या भाषांचाही अभ्यासक्रमात समावेश व्हावा. या निमित्तानं भाषेचं संवर्धन होईल, नवीन पिढी बोली भाषेच्या अभ्यासाकडे वळली तर भाषिक पेशी जिवंत राहतील.
- महेश केळुसकर, कवी, साहित्यिक