मुंबई महापालिकेच्या ५०४ बालवाड्या सुरु असून आणखी ३९६ बालवाड्या सेवाभावी संस्थांच्या वतीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, महापालिकेकडून सुरु असलेल्या या बालवाड्या केवळ कागदावरच आहेत. बालवाड्या कुठे सुरु आहेत? याचा पत्ता नाही, पण ज्या बालवाड्या सुरु आहेत, त्यातील अधिकाधिक बालवाड्यांमध्ये शिक्षकांची कमरता आणि बसण्याची गैरसोय असल्याच्या तक्रारींचा पाढा शुक्रवारी स्थायी समिती सदस्यांनी वाचला आहे.
एकूण ३९६ नवीन बालवाड्या सुरु करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता भाजपाचे मनोज कोटक यांनी पुढील वर्षी १०० बालवाड्या चालवण्यास सेवाभावी संस्थांनी का असमर्थता दर्शवली? असा सवाल केला. तसेच, या बालवाड्यांच्या शिक्षकांना ५ हजार आणि मदतनीसांना ३ हजार रुपये मानधनात कोण काम करणार? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बालवाड्या वाढवायला हव्यात आणि आठवीच्या पुढे दहावीपर्यंतही वर्ग सुरु व्हायला हवेत. त्यामुळे बालवाड्या महापालिकेने आपल्या स्तरावरच चालवाव्यात अशी त्यांनी सूचना केली.
मुंबईत सध्या ज्या ५०४ बालवाड्या सुरु आहेत, त्या कुठे सुरु आहेत, याची माहिती मागून चार महिने होत आले. तरी याची माहिती आपल्याला शिक्षण विभाग देत नसल्याची खंत शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी व्यक्त केली. बालवाड्या आवश्यक आहेत. परंतु, काही बालवाड्या चालू नसतानाही त्या संस्था पेमेंट घेत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
खुद्द शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी बालवाड्यांमध्ये बसण्याची सोय नसल्याचे सांगत काही बालवाड्यांमध्ये शिक्षकही नसल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या बालवाड्यांची माहिती समितीला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, याबाबत प्रशासनाकडून ठोस उत्तर न आल्यामुळे हा प्रस्ताव अखेर राखून ठेवण्यात आला.
हेही वाचा