बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगाने त्रस्त असून सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरद्वारे एक पत्र शेअर करत तिने ही माहिती दिली होती. आता मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सोनालीच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढलेले आहेत.
या फोटोमध्ये सोनालीसोबत तिच्या खास मैत्रिणी सुझेन रोशन आणि गायत्री ओबोरॉई दिसत आहेत. "या फोटोमधील व्यक्ती मीच आहे, आणि मी खूप आनंदी आहे कारण वेळोवेळी मला सहाय्य करणाऱ्या माझ्या दोन मैत्रिणी माझ्या सोबत आहेत"असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
कॅन्सर च्या उपचारामध्ये केमोथेरपी ही सर्वात महत्त्वाची थेरपी असते ज्यामुळे रुग्णांचे केस पूर्णपणे गळतात. सोनालीचे केस आता पूर्णतः गेले असून तिची प्रकृतीदेखील खालावली आहे. न्यूयॉर्कमध्ये उपचार चालू असताना तिच्या दोन जिवाभावाचा मैत्रिणी सुझेन रोशन आणि गायत्री ओबोरॉय तिला भेटायला आल्या. मैत्री दिनाच्या खास प्रसंगी सोनालीने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात मैत्रीचा भावनिक संदेश आहे. हा फोटो हृतिक रोशनने काढला आहे.