Advertisement

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जन्मदिनानिमित्त 'विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा'


डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जन्मदिनानिमित्त 'विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा'
SHARES

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे 'विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा' घेण्यात येणार आहे. 'जाती प्रथा आणि त्याच्या विविध समस्या' असा या स्पर्धेचा विषय असणार आहे. त्याचप्रमाणं या स्पर्धेत निवडलेले लघुपट वर्षभर महाराष्ट्रातील विविध शहरात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

तसंच शाळा-महाविद्यालयातून कलाकार व दिग्दर्शकांना घेऊन त्यावर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


१० मिनिटांचे लघुपट, माहितीपट

'विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा' ही स्पर्धा खुला गट, विद्यार्थी गट आणि अंनिस कार्यकर्ता गट अशा तीन गटांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना दहा मिनिटांचे लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशनपट बनवून २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान साधना मिडीया सेंटर, शनिवार पेठ, पुणे या पत्त्यावर पाठवायचे आहेत. यानंतर निवडलेल्या लघुपटांचे ३१ अाॅक्टोबर रोजी सादरीकरण केले जाणार आहे.


जन्मदिनी पारितोषिक वितरण

या स्पर्धेत विजेत्या लघुपटांना २५ हजार रुपये, १५ हजार रुपये आणि ५ हजार रुपये अशी तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसंच या स्पर्धेचं पारितोषिक वितरण डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनाच्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

आता 'अशी' दिसते सोनाली बेंद्रे !

अमृता-मनोजची केमिस्ट्री



 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा