केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन झाल्याने तो लवकरच मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून, त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्यतः मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी पोहोचतो, परंतु यावेळी तो 30 मे रोजी दाखल झाला आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमार्गे गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात. वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा मान्सूनचा वेगही बदलणार आहे.
नागरिकांना दिलासा मिळणार
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून अपेक्षापेक्षा लवकर केरळात दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. उकाड्याने होरपळून निघालेल्या नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. देशातील काही भागात मान्सूनपूर्व सरीदेखील बरसल्या होत्या. तर, अलीकडेच आलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, 4 जूनरोजी पुण्यात मान्सूनपूर्व सरी बरसणार आहेत.
तापमानात घट होणार
वेळेआधीच मान्सून मुंबईत दाखल झाला, तर उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो. गुरुवारी मुंबईचे तापमान 35 अंशांवर पोहोचले. त्याच वेळी, आर्द्रता 80% ते 90% नोंदवली गेली. आर्द्रतेमुळे येत्या काही दिवसांत तापमान कमी राहणार असले तरी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हवेतील आर्द्रता हा मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारा घटक आहे.
आयएमडीने यापूर्वी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु चक्रीवादळ रेमलमुळे, मान्सून वेगाने पुढे गेला आहे आणि केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागात वेळेपूर्वी पोहोचला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात पूर्व मोसमीसाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळं जून रोजी पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. तसंच, 4 जूनला नैऋत्य मोसमी वारे तळकोकणात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
हवामान विभागाने आता दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमधून आता कर्नाटकात दाखल झाला आहे. सध्या मान्सून तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यात पोहोचला असून येत्या 10 जूनला मान्सून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर काहीच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे. तर, मुंबईतही 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे.
हेही वाचा