'बिग बॉस'च्या घरात कधी काय होईल याचा नेम नाही. वादविवाद हा या घराचा जणू गुणधर्मच आहे, पण 'बिग बॉस'सुद्धा घरातील एखाद्या सदस्याला कधी कठोर शिक्षा सुनावतील याचाही नेम नाही.
'बिग बॉस'च्या घरात डझनभर दिवस घालवल्यानंतर इथे राहणाऱ्या सदस्यांचे खरे रंग दिसू लागले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपण समोरच्याला दुखावत आहोत याची जाणीवही कोणाला होत नाही. ती झाल्यावर मात्र पश्चाताप म्हणून आपल्या कृत्याची कबूली देत माफी मागण्याचा सिलसिलाही 'बिग बॉस'मध्ये सुरू झाला आहे. 'बिग बॉस' मात्र हा खेळ मुकाट्यानं पहात असून, नियमांचं उल्लंघन झालं तर त्याला कठोर शासनही करत आहेत. आता वीणा आणि शिवानी या घरात राहण्यास अपात्र ठरणार असल्याचं काहीसं वातावरण तयार झालं आहे.
'बिग बॉस' मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपलं. या टास्क दरम्यान घरामध्ये खूप क्लेश, हाणामारी आणि भांडणं झाली. सदस्यांनी एकमेकांचे कपडे, सामान उधळून लावलं. प्रत्येक सदस्य आपल्या टीमला टास्कमध्ये जिंकवण्यासाठी धडपडत होता. हे करताना काही सदस्यांकडून 'बिग बॉस'च्या घराच्या नियमांचं उल्लंघनही झालं. वेळोवेळी 'बिग बॉस' यांनी ताकीद देऊनही पूर्ण टास्कमध्ये सदस्यांनी हे सुरूच ठेवलं. याच चोर बाजार टास्कदरम्यान काल शिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमकीबरोबरच हाणामारीही झाली. 'बिग बॉस'च्या घरात मारहाणी करणं अथवा कुठल्याही प्रकारची हिंसा अमान्य असल्याचं ठाऊक असूनही रागावर ताबा न राहिल्यानं शिवानी आणि वीणाकडून हे कृत्य घडलं.
या कृत्यावर 'बिग बॉस' कठोर निर्णय घेणार हे नक्की. नियमांची पूर्णपणे कल्पना असूनही या दोघींनी हिंसक कृत्य केलं. या दोघींनी नियम तोडले आणि त्याचं समर्थन देखील केलं. या वागण्यातून दोघींची अखेळाडू वृत्ती दिसून येते. अशा प्रकारची हिंसा सुज्ञपणाच्या व्याख्येत मोडत नाही असं 'बिग बॉस' यांनी दोघींनाही निक्षून सांगितलं. अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घरात घडू नये अथवा अशा घटना घडण्यासाठी त्याला चालना मिळू नये म्हणून 'बिग बॉस'नी याससंदर्भात कठोर निर्णय सुनावला. तो म्हणजे शिवानी आणि वीणा 'बिग बॉस'च्या घरात रहाण्यास अपात्र आहेत. 'बिग बॉस'च्या या निर्णयानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या घरात आता दोन वेगवेगळे ग्रुप झाले आहेत. किचनमध्ये नेहा आणि किशोरी यांच्यात बराच वाद झाला. भांडणामध्ये नेहाचा आवाज बराच चढला. त्याची नेहानं माफीही मागितली; परंतु ती जे काही किशोरींना बोलली त्या भावनेविषयी ती माफी मागणार नाही असं तिनं सांगितलं. ज्यालाच अनसरून नेहाला किशोरी म्हणाल्या की, या घरामध्ये नकारात्मकता पसरवू नकोस आणि डिव्हाइड अँड रूल करू नकोस. या सगळ्यावर पराग म्हणाला की, खाण्यावरून या घरात राजकारण करू नका, नाहीतर आम्ही चार जणांचं वेगळं करून घेऊ. त्यावर नेहा म्हणाली की, आम्ही कुठलंही राजकारण करत नाही. घरामध्ये जितकी माणसं तितक्या प्रवृत्ती. एकाचं म्हणणं कधीच दुसऱ्याला पटत नाही.
परागनं त्याचं म्हणणं इतर सदस्यांनाही सांगितलं. आम्ही चार जण आमचं वेगळं करून घेऊ. त्यावर सुरेखा म्हणाल्या की, एकाच घरामध्ये वेगळी चूल मांडायला नको. त्यानं घरामध्ये भांडणं होतील, पण या घरामध्ये भांडणं होणार नाही याची जबाबदारी परागनं घेतली आहे. परागचं हे बोलणं आणि हा उपाय सुरेखा यांना पटला नाही. त्यांनी 'बिग बॉस'ला सांगितलं की, याला (पराग) घरातून बाहेर काढा. हा दोन चुली करायला लागला आहे. त्यानं जर चार लोकांचा स्वयंपाक केला, तर आम्ही जास्त लोक आहोत आम्ही कुठे करायचा स्वयंपाक. त्यामुळं 'बिग बॅास' यांनी वीणा-शिवानीला अपात्र ठरवणं आणि सुरेखा यांनी परागला घराबाहेर काढायला सांगणं असं काहीसं विचित्र वातावरण या घरात आहे.
हेही वाचा -
कंगनासोबत स्मिता कोणाशी घेणार ‘पंगा’?
'भारत'ने मोडला ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्याच चित्रपटांचे विक्रम