होळी, धुलीवंदन म्हणजेच रंगाचा सण आणि अबालवृद्ध या सणाची आतुरतेने वाटच बघत असतात. यंदा शुक्रवारी धुलीवंदन असल्याने सर्वत्रच या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारदेखील विविध रंग, पिचकारी आणि फुग्यांनी सजले आहे. पण, हल्ली रंगात केमिकलयुक्त रसायनं वापरली जातात. जे त्वचेसाठी अत्यंत हानिकार असतात. या रंगामुळे त्वचेची आग होणं, डोळ्यांना त्रास होणं, केस खराब होणं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रंग खेळताना काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वापासून आपला बचाव करायचा असेल तर काही उपाययोजना करणं देखील महत्त्वाचं आहे.
रंग खेळताना घ्या काळजी
ज्यांची त्वचा खूपच संवेदनशील (सेन्सेटिव्ह) असते अशांना त्वचेची अॅलर्जी, खाज, त्वचेला भेगा पडणं यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे धुलीवंदन या सणाला रंगांची उधळण करताना त्वचा, कान आणि डोळ्यांकडे विशेष लक्ष द्या. रंग खेळताना अचानक कुठून तरी फेकल्या गेलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे डोळ्याच्या दुखापतीची समस्या होऊ शकते. अशा वेळी तात्काळ वैद्यकीय उपचार फार महत्त्वाचे असतात, असंही डॉक्टर्स सांगतात.

अशी घ्या त्वचेची काळजी
- खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा वॅसलिन त्वचेला लावून रंगोत्सव साजरा करावा. यामुळे शरीराला लागलेले रंग लवकर धुवून निघण्यास मदत होते. रंग खेळताना संपूर्ण शरीर झाकले जाईल असेच कपडे परिधान करा.
- नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि त्याबद्दल जनजागृतीही करा
- हर्बल, हळद, चहा पाने, हिना, झेंडूची फुले यांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग बाजारात उपलब्ध असतात
- धुळवड खेळून घरी परतल्यावर भरपूर पाणी प्या. त्यामुळे रंग खेळताना चुकून तोंडात गेलेल्या रासायनिक पदार्थांची बाधा शरीराला होणार नाही
- होळी खेळून झाल्यावर लगेच पाणी वापरू नका. सुक्या हातांनी किंवा कपड्याने गुलाल किंवा रंग साफ करा
- रंग साफ करताना त्वचा घासू नका. साबणाऐवजी शक्यतो फेसवॉश वापरा
- जर रंगामुळे त्वचेवर परिणाम झाल्याचे जाणवल्यास संबंधित त्वचेचा भाग थंड पाण्याने धुवून काढावा किंवा गरज असल्यास कॅलामायन लोशन लावा
- चेहऱ्यावरचा रंग काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. हा रंग काढतानाही डोळे आणि ओठ बंद ठेवा

केसांसाठी हे करा -
- मुलींनी केस बांधूनच रंगपंचमी खेळावी. तसंच मुले आणि मुली दोघांनीही धुळवड खेळण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावावे. होळी खेळून आल्यानंतर केस कंडिशनरने धुवावं.
- केस सौम्य शॅम्पू, लेमन ज्यूसनेच धुवावेत. एकाच आंघोळीत रंग काढून टाकण्यासाठी सतत शॅम्पू वापरू नये.
- रंगामध्ये पेस्टपेक्षा पावडरचे रंग वापरा
- लाल आणि गुलाबी रंग हे जास्त हानिकारक नसतात त्यामुळे त्यांचा वापर करावा
डोळ्यांची कशी घ्याल काळजी ?
रंगामध्ये असणाऱ्या घातक केमिकल्समध्ये त्वचेची अॅलर्जी, कॅन्सर, डोळे चुरचुरणे किंवा दृष्टी जाण्याचा धोका असते. यामध्ये खडूची पावडर असून रंगांना शाईन येण्यासाठी काचेची पावडर देखील मिसळली जाते. तर, वॉटर कलर हे क्षारयुक्त असल्याने त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते. हे वॉटर कलर जर डोळ्यात गेले तर, दृष्टीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

काही खास टिप्स -
- जर चुकून डोळ्यांमध्ये रंग गेला तर डोळे चोळू नका
- थंड पाण्याने डोळ्यावर हळुवार पाणी मारा
- डोळ्यात रंग गेल्याने डोळे लाल झाले असतील तर वेळीच डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवा
- प्रवास करणार असाल तर गाडी किंवा बसच्या खिडक्या बंद ठेवा. अनेकजण फुगे किंवा पिशव्या मारतात, ज्यामुळे चूकून डोळ्यांना दुखापत होण्याची शक्यता असते.
- पाण्याचा फुगा चुकून डोळ्यांवर लागला तर त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांची भेट घ्या
- जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्म्याचा वापर करत असाल तर त्यादिवशी लेन्स किंवा चष्मा वापरू नका.
- लहान मुलांना रंग लावताना सावधगिरी बाळगा.
- जर तुम्हाला कोणी चेहऱ्यावर रंग लावत असेल तर ओठ आणि डोळे घट्ट मिटून घ्या
हेही वाचा -
होळीचं महत्त्व
वरळीत साकारली मुंबईतील सर्वात उंच होळी