सुनो मुंबईवालो... यहाँ से दूर दूर तक शहर में जब कोई बच्चा रोता था...
तब माँ कहती थी... सो जा बेटे... नही तो पुलिस आ जाएगी...
आणि पोरगं गपगुमान झोपायचं.
आज मुंबई पोलिसांची ही शान मिट्टी में मिला दी गयी...
...
गोव्यात ट्रॅफिक पोलिसांचा दरारा आहे. पर्यटक आणि स्थानिक गोयंकरही त्यांना घाबरतात. तीच गत कर्नाटकात. कुणाचीच सुटका नाही. मदत करतील, पण नियम तोडल्यास माफी नाही. मध्य प्रदेश, गुजरात इथे फिरल्यावरही तेच जाणवतं. सिक्किममधले रस्ते अरुंद आणि उभ्या चढणीचे. गंगटोक शहर पहाडावर आणि वाहनांनी विलक्षण गजबजलेलं. पण तिथले टॅक्सीवाले ट्रॅफिकवाल्यांच्या अस्तित्वाने थरथर कापतात. नो पार्किंग झोनमध्ये क्षणभरही थांबायला तयार नसतात.
पण महाराष्ट्रात आलं की चित्र बदलतं. रस्त्यावरच्या नियमांची ऐशीतैशी झालेली दिसून येते. आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे हाल तर वाईटच. गाड्या उदंड झाल्यात. दोन्ही बाजूंनी पार्किंग वाढलंय. रस्ते तेवढेच आहेत. त्यात खड्ड्या-बिड्ड्यांचं कवित्वही आता सांगण्यासारखं उरलं नाही. या सगळ्यात मुंबईचा वाहतूक पोलीस शिव्यांचा धनी होता होता आता हल्ल्यांचा बळीही ठरू लागलाय.
काही वेळा मीडियात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे काही घटनांमध्ये वाढ होते की काय, असा प्रश्न पडतो. मुंबई पोलिसांवरील हल्ल्यांच्या बातम्या रोज येऊ लागल्यावर या गृहितकावर विश्वास ठेवावासा वाटू लागला.
ट्रॅफिकवाल्यांच्या चिरीमिरीच्या गोष्टींच्या शिळ्या कढीला ऊत आणला गेला. वाढतं शहर मर्यादित पोलिस फोर्स वगैरे सिद्धांतही मांडले गेले. करप्शन तर सर्वत्रच आहे. शहरं तर लोकसंख्या आणि गाड्यांनी सगळीकडेच वाढतायत.
पण मुंबईतल्या खाकीतल्या माणसाबद्दल जो भीतीयुक्त दरारा वाटायचा तो मात्र संपल्याचं विदारक चित्रं दिसतंय. पोलिसाचं आता फक्त बुजगावणं झालंय का?
मीडियावाले, राजकीय कार्यकर्ते, छपरी पोरं-टोरं, चरसी-दारुड्या कुणीही सिग्नल जम्प करतो, विदाऊट हेल्मेट जातो आणि अडवल्यावर ट्रॅफिकवाल्याला दम देतो. अंगावर गाडी घालतो. अंगावर धावून जातो. मारहाण करतो. या मागची सोश्यो-सायकोलॉजिकल कारणं खूप सारी देता येतील.
पण तळाशी एकच कारण उडतं...
पोलिसाचा दरारा संपलाय !
आणि मुंबई पोलिसाला त्याची प्रतिष्ठा पुन्हा मिळवायची असेल तर त्याला पुन्हा एकदा पोलिस व्हावं लागेल.
कायद्याचा तडफदार आणि जिगरबाज रक्षक व्हावं लागेल...
हे असं बुजगावणं नव्हे !