नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रूग्णसंख्या रोज वाढतच आहे. आगामी काळात आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांतील या सुविधांमध्ये महापालिकेकडून वाढ केली जात आहे.
सध्या नेरूळ येथील डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत २०० आयसीयू बेड्स आणि ८० व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात नियोजित १०० आयसीयू बेड्स आणि ४० व्हेंटिलेटर्सपैकी पहिल्या टप्प्यात आजपासून २० आयसीयू बेड्स आणि १० व्हेटिलेटर्सची सुविधा कार्यान्वित झालेली आहे. आगामी १० दिवसांच्या कालावधीत उर्वरित आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहेत.
दररोज संध्याकाळी ७ वाजल्यापासून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर नियमितपणे ३ ते ४ तास वेबसंवादाव्दारे सर्व खाजगी रूग्णालयांतील महानगरपालिकेचे नोडल अधिकारी तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व विभागांचे सहा.आयुक्त आणि आरोग्य विभागातील व इतर विभागांचे या कामाशी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करीत आहेत. यामधून पुढील कार्यवाहीची दिशा ठरविली जात आहे.
यामध्ये ट्रिटमेंट प्रोटोकॉल सोबतच डिस्चार्ज प्रोटकॉलचे पालन करण्यावर भर देण्याचे निर्देशित करण्यात येत असून त्याचा रूग्णालयनिहाय आढावा घेतला जात आहे. याशिवाय बेड्स उपलब्धता, रूग्णवाहिका, ऑक्सिजन, ऑषधसाठा, रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसींग ), कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी या महत्वाच्या बाबींचाही तपशील जाणून घेतला जात आहे तसेच त्यामध्ये सुधारणा सूचविल्या जात आहेत.
हेही वाचा -
पश्चिम उपनगरातील 'हे' भाग ठरताहेत कोरोनाचा हॉटस्पॉट