नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मागील महिनाभर रोज ५० पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही अधिक आहे. सध्या पालिका क्षेत्रात ६७३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या ६९१० खाटांपैकी ५८९० खाटा रिकाम्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशातच कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, गेले दोन दिवसांत पुन्हा रुग्णवाढ सुरू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. नवी मुंबईत मात्र अद्याप चांगली परिस्थिती आहे. गेले महिनाभर दैनंदिन रुग्णसंख्या शंभपर्यंत होती ती कमी होत गेल्या आठवडाभरात ५० पेक्षा कमी झाली आहे. दररोज बरे होणारे रुग्ण हे त्यापेक्षा अधिक असल्याने शहरात उपचार घेणार्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही ५४७ इतकीच आहे. त्यामुळे कोरोना रुग्णासाठी असलेल्या खाटा आता रिकाम्या झाल्या आहेत. पालिकेच्या विविध कोरोना काळजी केंद्रे व रुग्णालयांत एकूण ६९१० खाटांची व्यवस्था आहे. त्यापैकी ५८९० खाटा रिकाम्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात पुरेशा प्रमाणात कोविड लसीचे डोस उपलब्ध झाल्याने ८ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत १ लाख ५ हजार ४७६ नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस तसेच ६६ हजार ६४२ नागरिकांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खासगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी आतापर्यंत ८ लाख ७ हजार ४१५ नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच ३ लाख ४ हजार १५५ नागरिक कोविड लसीचे दोन्ही डोस घेत पूर्ण संरक्षित झालेले आहेत. यामध्ये एकूण ११ लाख ११ हजार ५७० डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत.