देशात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. भारतात मंकीपॉक्स विषाणूचे चार रुग्ण आढळले असून एका संशयित रुग्णाचीही नोंद झाली आहे. वाढता धोका पाहता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कोरोना विषाणूप्रमाणेच मंकीपॉक्स विषाणूसाठीही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दिल्लीमध्ये 24 जुलै रोजी मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळला आणि त्यामुळे देशातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत दिल्लीतील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 14 लोकांची ओळख पटली असून त्यापैकी कोणालाही लक्षणं दिसून आलेली नाहीत.
दिल्लीआधी केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान आणखी एका रुग्णामध्ये मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे आढळली आहेत. या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून रुग्णाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.
मंकीपॉक्स रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना
- रुग्णांना 21 दिवसांचं आइसोलेशन, जखमा झाकण्याचा सल्ला, मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, जखमांवरील खपल्या पूर्णपणे निघून जाईपर्यंत काळजी घेणे.
- संक्रमित व्यक्तीने ट्रिपल-प्लाय मास्क घालावा.
- इतरांशी संपर्क होण्याचा धोका कमी करण्यासाठी त्वचेच्या जखमा शक्य तितक्या चांगल्या प्रमाणात झाकल्या पाहिजेत.
- रुग्णांची काळजी घेताना योग्य वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) वापरा.
- लक्षणे नाहीत पण मंकीपॉक्स रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी रक्त, पेशी, ऊती, अवयव किंवा वीर्य दान करू नये.
- संक्रमित प्राणी किंवा माणसाच्या संपर्कात आल्यानंतर हात स्वच्छ ठेवावेत. उदाहरणार्थ, साबण आणि पाण्याने हात धुणे किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरणे.
- जेव्हा रुग्णाला ताप आणि पुरळ येत असेल तेव्हा त्याच्या जवळ जाताना पीपीई किटचा वापर करावा.
मंकीपॉक्सची लक्षणं
- मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप येणे हे सुरुवातीचं लक्षणं आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णामध्ये एक ते तीन दिवसांमध्ये ताप येतो. हा ताप दोन ते चार आठवडे राहण्याची शक्यता असते. दुसरं लक्षणं म्हणजे त्वचेवर पुरळ उठते किंवा जखमा होतात.
- मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये पुरळ उठणे किंवा जखमा होणे यांचा समावेश आहे. अशी लक्षणं आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावा. आरोग्य अधिकाऱ्यांच्या योग्य देखरेखीखाली राहावं.
हेही वाचा