मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) सहा रुग्णालयामधील क्लीनअप मार्शलची (clean up marshall) नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे रुग्णालयाच्या आवारात क्लीनअप मार्शल दिसणार नाहीत. क्लीन अप मार्शल पैसे उकळत असल्याच्या तक्रारी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्यानंतर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला.
मुंबई महापालिकेने (bmc) एप्रिल 2024 मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात 30 प्रमाणे संपूर्ण मुंबईत (mumbai) मार्शल नेमले आहेत. महापालिकेच्या सहा रुग्णालयांमध्येही मे 2024 पासून क्लीन अप मार्शल नेमण्यात आले होते.
पालिकेच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही येत असतात. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक गुटखा, पान खाऊन थुंकतात, उरलेले अन्न कुठेही फेकतात, पाण्याच्या बाटल्या फेकतात, कचरा टाकतात. त्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता होते.
यावर तोडगा म्हणून महापालिकेच्या नायर, शीव, केईएम, कूपर, राजावाडी आणि कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात क्लीन मार्शल नियुक्त केले होते. मात्र कारवाईच्या नावाखाली क्लीन अप मार्शल रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या.
त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मल्लिन होत असल्याने रूग्णालय व आवारातील क्लीन अप मार्शलची नियुक्ती मागे घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याबाबतचे आदेशच घनकचरा व्यवस्थापन विभागाने जारी केले आहेत.
मुंबई महापालिकेने एप्रिल 2024 मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात 30 प्रमाणे संपूर्ण मुंबईत मार्शल नेमले आहेत. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, रस्त्यावर स्नान करणे, मलमूत्र विसर्जन करणे अशा प्रत्येक चुकांसाठी हे क्लीन अप मार्शल नागरिकांकडून 200 रुपये ते एक हजार रुपये दंड वसूल करतात व त्यांचे प्रबोधनही करतात.
वसूल केलेल्या दंडापैकी 50 टक्के रक्कम क्लीन अप मार्शलचा पुरवठा करणाऱ्या संस्थेला तर 50 टक्के रक्कम पालिकेला मिळते.
दरम्यान, गेल्या महिन्यात क्लीन अप मार्शल संस्थाना मुंबई महापालिका प्रशासनाने दंड लावला होता. क्लीन अप मार्शलनी कामात कुचराई केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयात झालेल्या एका बैठकीत क्लीन अप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली.
कामात कसूर करणाऱ्या क्लीन अप मार्शल संस्थांना पालिका प्रशासनाने दंड लावला. बारापैकी सात कंत्राटदारांना दंड (fine) लावण्यात आला असून एकूण सुमारे 65 लाख दंड लावण्यात आला आहे. त्यातच आता रुग्णालयाततून क्लीन अप मार्शल हद्दपार करण्यात आले आहेत.