शहरातील कुठल्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची चालू स्थितीतील माहिती लवकरच मुंबईकरांना मिळू शकणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका आणि इतर खासगी रुग्णालयातील ताब्यात घेतलेल्या खाटांची माहिती एकत्र करून रिअल टाइम डॅशबोर्ड बनवण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना केल्या आहेत. यामुळे रुग्णांना त्वरीत अॅमिडट करून घेण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी २९ मे रोजी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त आय.एस. चहल आदी उपस्थित होते.
खाटांना युनिक आयडी
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, खाजगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यात घेण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुससार आता महापालिकेकडे रुग्णांसाठी अधिक चांगल्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व खाटांचं नियोजन करून संगणकाच्या माध्यमातून रिअल टाइम डॅशबोर्ड बनवण्यात यावा. खाटा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक खाटेला युनिक आयडी देण्यात यावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली.
हेही वाचा - आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासाेबत शिक्षाही होणार
खाजगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स मुंबई महापालिकेने ताब्यात घेतल्याने रुग्णांसाठी अधिक चांगल्या प्रमाणात सुविधा उपलब्ध. या सर्व खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये करावे. प्रत्येक बेडला युनिक आयडी द्यावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 29, 2020
कोविड सेंटरचा आढावा
येत्या सोमवारपर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांसाठी एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, बांद्रा व नेस्को, गोरेगाव या ठिकाणी एकूण २४७५ खाटा उपलब्ध होत आहेत. बीकेसी इथं एमएमआरडीने १५ दिवसांत उभारलेलं देशातील पहिलं ओपन हॉस्पिटल (आयसीयू २०० खाटा १००० खाटांची जम्बो सुविधा), महालक्ष्मी इथं युद्धपातळीवर सुरु असलेल्या कोरोना केअर सेंटरचं (CCC) काम, नेस्को गोरेगाव येथील ५३५ खाटांची जम्बो सुविधा, रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड इथं ७००० पेक्षा जास्त खाटांची सुविधा असलेल्या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (DCH) यांची उभारणी या सर्वांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला.
७२ प्रयोगशाळा
जगात आणि इतर देशात कोविड १९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचं प्रमाण ५ ते ७ टक्के असताना राज्यातील मृत्यू दर ३.३ टक्के आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोविड १९ प्रादुर्भावापूर्वी कोविड विषाणू चाचणीसाठी राज्यात केवळ २ प्रयोगशाळा होत्या. पण फक्त २ महिन्यात आपण राज्यात ७२ प्रयोगशाळा सुरू केल्या. तर येत्या आठवड्यात नव्या २६ प्रयोगशाळा कार्यान्वित होतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा - विद्यापीठ परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार कुलगुरूंची बैठक