Advertisement

Coronavirus Updates: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं टाटा रुग्णालयही सावध

टाटा कॅन्सर रुग्णालयानेही गर्दी जमवू नका, तातडीनं आवश्यकता नसेल तर फॉलोअपसाठी नंतर या, असे आवाहन रुग्णांना करण्यात आलं आहे.

Coronavirus Updates: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं टाटा रुग्णालयही सावध
SHARES

मुंबईतील परळ येथील टाटा रुग्णालयात राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. या रुग्णालयात रुग्णांची गर्दी असल्यानं कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं करोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता, इतर रुग्णालयांप्रमाणे टाटा कॅन्सर रुग्णालयानेही गर्दी जमवू नका, तातडीनं आवश्यकता नसेल तर फॉलोअपसाठी नंतर या, असे आवाहन रुग्णांना करण्यात आलं आहे.

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना करोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळं कॅन्सरग्रस्तांना अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीनं सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांचं तातडीचे वैद्यकीय उपचार सुरू आहेत, त्यांनाच रुग्णालयात सोडले जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांचे स्क्रिनिंग केलं जाणार आहे. कॅन्सरव्यतिरिक्त ताप आलेल्या रुग्णांना संसर्गाचा धोका लक्षात घेता, आत प्रवेश देण्यात येणार नाही.

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ७ ते ८ ठिकाणी निवासी डॉक्टरांसोबत सर्जरी तसेच रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टचं पथक उपस्थित असणार आहे. रुग्णांचं स्क्रिनिंग झाल्यानंतर ओपीडीची गरज कोणत्या रुग्णांना आहे हे ठरवून, त्यानुसार आत प्रवेश देण्यात येणार आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारची शंका असेल तर डॉक्टरांशी फोनवरून संपर्क साधून निरसन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

तातडीची निकड नसलेल्या काही रुग्णभेटीच्या वेळा पुढे ढकलण्यात येणार आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी ३ आवरण असलेलं सर्जिकल मास्क घालणं, तसंच सॅनिटाझयर लावणं बंधनकारक आहे. ३१ मार्चपर्यंतच्या रुग्णांच्या नव्या भेटीच्या वेळा रुग्णालयाच्या आयटी विभागाकडून कळवण्यात येणार आहेत.

डॉक्टर, परिचारिका, 'ओपीडी'मध्ये असलेले वॉर्डबॉय यांना प्रत्येक दिवसाला एक सर्जिकल मास्क देण्यात येत आहे, तर तुलनेनं संसर्ग होण्याचा धोका कमी असलेल्यांना कपड्यांचे धुता येतील असे तीन मास्क देण्यात आले आहेत. टाटा रुग्णालयामध्ये नेहमी गर्दी असते. 'करोना' या जागतिक आपत्तीचा सामना करण्यासाठी स्वच्छता राखणे आणि अधिक जबाबदार सार्वजनिक वर्तन करणे गरजेचे आहे. त्यामुळं येणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचं निर्णय घेण्यात आले आहेत.



हेही वाचा -

Corona Virus: ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई थांबवा

मुंबईतील राणीबागेत सुरू होणार हॉटेल



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा