गोरगरीब रुग्णांच्या उपचारांत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. या विस्तारीकरणाचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.
जे.जे.रुग्णालय विस्तारित इमारतीच्या आराखड्यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह हेल्थ ब्रिजचे ॲडव्हायझर शैलेश गद्रे उपस्थित होते. (maharashtra medical education minister amit deshmukh reacts on jj hospital extension)
हेही वाचा- मुंबईत प्रथम आरोग्य सेवकांना देणार कोरोना लस
मुंबईतील सर्वात जुन्या रुग्णालयांपैकी एक जे.जे. रुग्णालय आहे. रुग्णालयाचा कॅम्पस अंदाजे ४४ एकर परिसराचा आहे. वर्षाला १,२००,००० रुग्णांवर इथं उपचार होतात. सध्याच्या घडीला जे.जे. हे मुंबईतील महत्वाचं नॉन कोव्हिड रुग्णालय आहे. त्यामुळे कोव्हिड व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी नेहमीच गर्दी असते. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात रुग्णालयातील तळमजल्यावर प्रचंड पाणी साचलं होतं. ओपीडीमध्ये आलेल्या रुग्णांना पावसाचा फटका बसला होता.
विस्तारीकरणाच्या आराखड्याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, जे. जे. रुग्णालय अतिविशेषोपचार रुग्णालयात रुपांतरित करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या आवारातच १० मजली अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या अत्याधुनिक रुग्णालयामुळे रुग्णांना एकाच इमारतीमध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. अतिविशेषोपचार रुग्णालय उभारणीसंदर्भातील कामांची आखणी होणं आवश्यक आहे.
हेही वाचा- १५ दिवसांत २००२ प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध उठवले