Advertisement

एका लग्नाची गोष्ट! लग्नाचे पैसे वाचवून क्वारंटाईन सेंटरला मदत

मुंबईत कोरोना महामारीदरम्यान एका जोडप्यानं कौतुकास्पद उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.

एका लग्नाची गोष्ट! लग्नाचे पैसे वाचवून क्वारंटाईन सेंटरला मदत
SHARES

लग्न म्हटलं तर खर्च तर आलाच... थाटामाटात करायचं म्हटलं तर मग लाख काय नी करोड काय... लोकं कितीही खर्च करायला तयार असतात. फक्त काय तर लग्न पाहून लोकांच्या भुवया उचावल्या पाहिजेत. सर्वत्र चर्चा झाली पाहिजे. पण मुंबईतल्या एका जोडप्यानं मात्र अभिमानं वाटावा असं काम केलं आहे.

मुंबईत कोरोना महामारीदरम्यान एका जोडप्यानं कौतुकास्पद उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. फक्त २२ पाहुण्यांच्या समक्ष जोडप्यानं एकदम साध्या पद्धतीनं लग्न केलं आणि लग्नासाठी जमवलेल्या पैशातून ५० बेड एका क्वारेंटाइन सेंटरला दान केले. याशिवाय हनीमूनला जाण्याऐवजी दोघे कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करणार आहेत. या जोडप्याच्या कामाची दखल आमदार क्षितिज ठाकुर यांनी देखील घेतली आहे. त्यांच्याकडून जोडप्याला एक प्रशंसा पत्रही देण्यात आलं आहे.

मुंबईतील वसईमध्ये राहणारा एरिक लोबो (28) आणि मर्लिन टस्कैनो (27) यांनी आपल्या ७ वर्षांच्या नात्याला नाव देण्याचं ठरवलं. दोघांचं लग्न जूनमध्ये ठरलं होतं. जवळपास लग्नासाठी २ हजार पाहुणे हजर राहणार होते. अगदी थाटात हे लग्न होणार होतं. पण त्यांच्या लग्नाच्या काही महिने आधी देशावर कोरोनाचं सावट पसरलं. त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नात काही बदल करण्याचं ठरवलं. त्यानुसार केवळ साध्या पद्धतीनं लग्नसोहळा करायचा निर्णय घेतला.

दोघांनी शनिवारी वसईच्या सेंट गोनसालो चर्चमध्ये साध्या पद्धतीनं फक्त २२ लोकांसमोर लग्न केलं. संध्याकाळी कोणतेच रिसेप्शन ठेवलं नाही. रिसेप्शनसाठी जे पैसे जमा केले होते, त्या पैशातून या दोघांनी सतपाला आयसोलेशन सेंटरला ५० बेड्स, गाद्या, उशा, चादरी आणि ऑक्सीजन सिलिंडरही दान केले.

मर्लिननं एका वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'या महामारीमध्ये रुग्णालयांना बेड्सची गरज आहे. आम्हाला खूप आनंद वाटत आहे की, या महामारीमध्ये आम्ही लोकांच्या कामी आलोत.'

एरिक आणि मर्लिन हे दोघं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतात आणि हे लग्न कमीत कमी खर्चात करुन, त्यांनी आपले काम दाखवून दिलं आहे. दोघांनी प्री-वेडिंग कार्यक्रम देखील केले नाहीत. लग्नात आलेल्या पाहुण्यांकडून त्यांनी कोणतंच गिफ्ट घेतलं नाही. इतकच नाही, तर मर्लिननं लग्नात घालण्यासाठी नवीन गाउनही घेतला नाही. भाड्याच्या गाऊन घालून तिनं लग्न केलं.

मर्लिननं सांगितलं की, प्रवासी मजुरांसाठी कम्युनिटी किचनसोबतच ट्रेनची व्यवस्था केली आहे. शक्य तेवढी मदत प्रवासी मजुरांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही लग्नानंतर हनीमूनला जाणार होतो. पण आता त्याऐवजी कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा करण्याचं ठरवलं आहे.



हेही वाचा

सिद्धविनायक मंदिर उचलणार शहीद सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा