खारघरच्या मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळणार आहे. यासाठी एक वॉर्ड उभारण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत या वॉर्डाचे उद्घाटन करण्यात आले.
या वॉर्डात कॅन्सरसाठी केमोथेरपी करता येते आणि आता त्याच दिवशी घरी जाता येईल. यावेळी चिवटे म्हणाले की, या रुग्णालयात केमोथेरपी घेणाऱ्या सर्व रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. कर्करोगावरील शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना 1 लाख आणि अवयव प्रत्यारोपणासारख्या जटिल शस्त्रक्रियांसाठी 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले जातील, असेही चिवटे यांनी जाहीर केले.
खारघर, नवी मुंबई येथील मेडिकोव्हर हॉस्पिटलने कॅन्सरशी लढा देणाऱ्या रुग्णांना तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे. रूग्णालयाचे प्रमुख डॉ.माताप्रसाद गुप्ता म्हणाले की, रूग्णालय केवळ रोगावर उपचार करत नाही तर या आव्हानात्मक काळात रूग्णांचा त्रास आणि गैरसोय कमी करण्याचाही प्रयत्न करतो.
केमोथेरपीनंतर घरी परतणे वेदनादायक असल्याने कर्करोगाचे रुग्ण सर्वात कमजोर असतात. यासाठी केमोथेरपीनंतर रुग्णांना त्याच दिवशी घरी परतता यावे यासाठी मेडिकोव्हरने केमो डे केअर वॉर्डचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या रुग्णालयात उच्च दर्जाचे आणि यशस्वी कर्करोग उपचार उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा